17 ऍम्ब्युलन्सद्वारे घरोघरी मिळणार सेवा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील जनावरांना वेळेत उपचार देण्यासाठी पशुसंगोपनच्या ताफ्यात 17 फिरती पशुचिकित्सालये दाखल झाली आहेत. पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांच्या हस्ते गो-मातेचे पूजन करून फिरत्या पशुचिकित्सालयाचा लोकार्पण सोहळा झाला. पालकमंत्री गोविंद कारजोळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून पशुचिकित्सालय वाहनांचा शुभारंभ सुवर्णसौध येथे करण्यात आला. बेळगाव विभागातील सात जिल्हय़ांसाठी 82 फिरती पशुचिकित्सालये मंजूर झाली आहेत. त्यामुळे आता पशुपालकांच्या जनावरांना थेट गोठय़ापर्यंत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जिल्हय़ात असलेल्या अपुऱया पशु दवाखान्यांमुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत नव्हते. दरम्यान, पशुपालकांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत होते. जिल्हय़ात तब्बल 17 पशुचिकित्सालय वाहने फिरणार असल्याने जनावरांना वेळेत आणि तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. त्या तुलनेत दवाखान्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे फिरती पशुचिकित्सालये आधार ठरणार आहेत. राज्यात एकूण 275 फिरती चिकित्सालये सुरू केली आहेत. त्यापैकी बेळगाव विभागातील बेळगावला 17, बागलकोट 13, धारवाड 8, कारवार 11, विजापूर 14, हावेरी 9, गदगला 7 फिरती पशुचिकित्सालये सुरू झाली आहेत.
फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांच्या माध्यमातून कृत्रिम गर्भधारणा, लसीकरण, औषधोपचार आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर शेतकऱयांच्या दारापर्यंत पशुचिकित्सालय वाहन येणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री शशिकला जोल्ले, लोकप्रतिनिधी, पोलीस आयुक्त, पशुसंगोपन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जनावरांच्या सेवेत
जनावरांना एकाच छताखाली आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध क्हाव्यात, यासाठी महांतेशनगर येथे उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते झाले. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनावरांवर उपचार, कृत्रिम गर्भधारणा, रक्त तपासणी, अवघड शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर सुसज्ज अशी प्रयोगशाळाही उभारण्यात आल्याने अनेक आजारांचे निदान होणार आहे. यासाठी तज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.