Tarun Bharat

आदर्श ग्रामातील 22 व्या लोकोत्सवाचे शानदार उद्घाटन

ग्रामीण संस्कृतीशी नाते असलेला महोत्सव : राज्यपाल पिल्लई, काणकोणच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष : मुख्यमंत्री सावंत, 23 मान्यवरांचा सत्कार

प्रतिनिधी /काणकोण

गोव्याचे राज्यपाल डॉ. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पारंपरिक समई प्रज्वलित करून आमोणे येथील आदर्श ग्रामात आयोजित केलेल्या 22 व्या लोकोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन केले. मुख्य शामियानात आयोजित केलेल्या उद्घाटन सोहळय़ाच्या व्यासपीठावर आदर्श युवा संघाचे संस्थापक असलेले सभापती रमेश तवडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, एसटी मोर्चाच्या केंद्रीय अध्यक्षा व बिहारच्या आमदार निकी हेमरन, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मयेचे आमदार पेमेंद्र शेट, वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हजर होते.

लोकोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष अंकुश गावकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, लोलयेच्या सरपंच प्रतिजा बांदेकर, श्रीस्थळच्या सरपंच सेलजा गावकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर, खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, बार्से जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप आणि काणकोण भाजपाचे अध्यक्ष विशाल देसाई उपस्थित होते. याशिवाय उपस्थितांमध्ये एसटी मोर्चाचे दीपक करमरकर, भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड, संघटन सचिव बी. सतीश, सर्वानंद भगत, काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, विविध खात्यांचे सरकारी अधिकारी, भाजपाच्या मंडळ समितीचे व महिला मोर्चाचे पदाधिकारी समाविष्ट होते.

ग्रामीण संस्कृतीशी नाते असलेल्या लोकोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करतानाच आपण आतापर्यंत तीन वेळा काणकोण मतदारसंघात आलेलो आहे, याचा उल्लेख राज्यपाल पिल्लई यांनी केला. येथील प्राचीन संस्कृतीला उजाळा देण्याचा आपला प्रयत्न असून पर्तगाळी येथील अत्यंत प्राचीन असलेल्या वटवृक्षाच्या परिसराला नवी दिशा देण्याचा आपला प्रयत्न आहे. गोव्यात अशा प्रकारची 35 प्राचीन स्थळे आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

ग्रामीण लोकसंस्कृती जतन करण्याचे काम : सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवभारताच्या निर्मितीबरोबरच स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना साकार होण्यासाठी माणसांचा विकास होणे गरजेचे आहे. लोकोत्सवाच्या माध्यमातून मागच्या 22 वर्षांपासून सातत्याने गोव्याची ग्रामीण लोकसंस्कृती जतन करण्याचे काम सभापती रमेश तवडकर करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचा मुक्तकंठाने गौरव केला. लोकोत्सवातून संस्कृतीबरोबरच लोकवेद, खाद्यसंस्कृती, वनौषधी आणि ग्रामीण खेळांना चालना देण्याचे जे काम चालू आहे त्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला.

मडगाव-काणकोण रस्त्याचे काम लवकरच

काणकोण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकडे सरकारचे लक्ष असून सर्वांची मागणी असलेल्या मडगाव ते काणकोणपर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरच हातात घेण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. गोव्याचा पुढील 25 वर्षांतील विकास नजरेसमोर ठेवून कुशल कामगारनिर्मिती आणि रोजगारनिर्मितीकडे लक्ष देण्यात येणार आहे. काणकोणबरोबरच सर्व तालुक्यांच्या विकासाकडे सरकारचे लक्ष आहे, असे सांगून सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मातीशी जोडलेला महोत्सव : तवडकर

लोकोत्सव हा मातीशी जोडलेला महोत्सव असून गावचा माणूस कसा समृद्ध होईल याकडे आपले लक्ष आहे. सभापतीपदाला योग्य न्याय देण्याचा आपला प्रयत्न असून आपल्याइतका सुखी माणूस दुसरा कोणी नसेल. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या बळावर आपण अवघ्या 33 दिवसांत दोन घरे बांधून दिली. येत्या पाच वर्षांत नवी 100 घरे उभारण्याचा आपला संकल्प आहे, असे सांगून सभापती तवडकर यांनी त्यासाठी राज्यपाल व मुख्यमंत्री त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आपल्या स्वागतपर भाषणातून आणि प्रास्ताविकातून व्यक्त केली. पुढील पाच वर्षांत काणकोण मतदारसंघातील एकही व्यक्ती हताश असणार नाही. काणकोण हा एक आदर्श मतदारसंघ बनविण्याचा आपला मनोदय असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, बिहारच्या आमदार निकी हेमरन यांनी आपल्या मनोगतात लोकोत्सव-22 च्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

23 मान्यवरांचा सत्कार

लोकोत्सवाच्या तीन दिवसांत मिळून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या 65 जणांचा सत्कार करण्यात येणार असून पहिल्या दिवशी सकाळी 12 जणांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात मनोज सावईकर, दीपक सिन्हा, डॉ. दीपा कुर्रेय्या आफोंसो, स्टीफन फर्नांडिस, उत्तम पार्सेकर, डॉ. साईनाथ विश्वास वायंगणकर, पांडुरंग दत्ताराम वझे, डॉ. संगम कुराडे, ऍड नारायण नार्वेकर, प्रवीण प्रकाश गावस, पी. ए. सूर्यवंशी, विजय सक्सेना यांचा समावेश राहिला.

तर संध्याकाळी किशोरी आनंदू कोमरपंत, विनायक प्रभाकर वळवईकर, प्रेमानंद यशवंत गावडे, प्रसाद ना. गावकर, डॉ. रघुनाथ बाबनी धुरी, मनोहर एस. बोरकर, भिवा एस. नाईक, सविता देसाई, दिया दीपक फडते, रामचंद्र कृष्णा पालेकर आणि राजेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन सोहळय़ात बलराम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांना वंदना गावकर, संजय गावकर, प्रेडा फर्नांडिस, पल्लवी पै, स्वाती नाईक, वर्षा जगताप, रिदम कोमरपंत यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले. सूत्रसंचालन प्रसाद पागी आणि सेलजा गोन्साल्वीस यांनी केले. सकाळच्या सत्रातील सत्कारमूर्तींचा परिचय अरविंद खुटकर आणि आनंदू देसाई यांनी केला. अशोक गावकर यांनी आभार मानले.

या महोत्सवात तीन विविध रंगमंच उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय संस्कृती भवन, आश्रम शाळा परिसर या ठिकाणी विविध स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी शालेय स्तरावर मुकाभिनय, समूहनृत्य, लोकनृत्य, कथाकथन, नाटय़छटा, फुगडी, एकेरी नृत्य, वेशभूषा, चित्रकला व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या.

आजचे कार्यक्रम

आज 10 रोजी मुख्य शामियान्यात देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व, मुकाभिनय, एकपात्री, राज्यस्तरीय एकेरी नृत्य, गोव्याची लोकनृत्ये, प्रश्नमंजूषा, फुगडी, राज्यस्तरीय समूहनृत्य, रांगोळी, पोस्टर आदी स्पर्धा तसेच विज्ञान प्रकल्प प्रदर्शन होणार आहे. संध्याकाळी 7 वा. माशे, दापट येथील गॉड्स गिफ्ट सभागृहात विविध राज्यांतील लोकनृत्य पथकांचा कार्यंक्रम होणार आहे.

या लोकोत्सवात यंदा 12 विविध राज्यांतून लोककलाकारांची पथके आलेली असून त्यांच्या बहारदार अशा लोकनृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर कृषी बियाणी, कृषी अवजारे, सौर उपकरणे, पाण्याचे पंप, स्वयंसाहाय्य गटांचे खाद्यपदार्थ, जैवविविधता व्यवस्थापन समितीचे खास दालन, तयार कपडे, विविध प्रकारच्या फुलझाडांची रोपवाटिका, गावठी औषधे आणि ग्रामीण खाद्यपदार्थ यांची खास दालने उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय मातीकाम, साहसी उपक्रम, विविध ग्रामीण खेळांच्या स्पर्धा यांचा समावेश असून राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांनी विविध दालनांना भेट देऊन लोकोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक केले. या लोकोत्सवात मागच्या कित्येक वर्षांपासून गोपीनाथ गावस हे जुन्या वस्तूंचे प्रदर्शन घडवत आले असून या संग्रहाबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक केले. 11 रोजी संध्याकाळी 5 वा. लोकोत्सवाचा समारोप होणार आहे.

Related Stories

म्हादईप्रश्नी शास्त्रोक्त अभ्यासाअंती निर्णय

Patil_p

जनतेच्या समस्या प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार-मंत्री हळर्णकर

Amit Kulkarni

1.20 कोटी फसवणूक प्रकरण आज 14 रोजी मडगाव कोर्टात

Omkar B

जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानुसार करंजाळे येथे मासेविक्रीला सुरूवात

Patil_p

पर्ये मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षभरात मिटणार

Amit Kulkarni

बेळगावातून येणाऱया भाजीवर कठोर नजर ठेवण्याची गरज

Omkar B