टायगर सफारीचे आकर्षण : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चालना : तब्बल 39.68 हेक्टर क्षेत्रातील संग्रहालयात विविध सुविधा उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाचे गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले, पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार सतीश जारकीहोळी, सी. सी. पाटील, अण्णासाहेब जोल्ले, वनखात्याचे कार्यदर्शी जावेद अख्तर यांसह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते फीत सोडवून संग्रहालयाचे आणि टायगर सफारीचे उद्घाटन झाले.
म्हैसूर प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील मिनी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. तब्बल 39.68 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या संग्रहालयात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वाघ, सिंह बिबटे, कोल्हे, हरिण, चितळ, सांबर, तरस, जंगली कुत्रे आदींसह विविध जातींचे पक्षीदेखील दाखल झाले आहेत. या प्राण्यांची विशेष होल्डींग रूममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर कर्नाटकात म्हैसूरनंतर हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
यावेळी यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, राज्यात म्हैसूरनंतर भुतरामहट्टीत प्राणीसंग्रहालय उभारण्यात आले आहे. शिवाय उद्योग खात्री योजनेंतर्गत दोन कोटीच्या अनुदानातून विकास साधला जात आहे.
प्राणीसंग्रहालयात टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचे टायगर सफारीचे स्वप्नदेखील पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर इतर प्राणीदेखील जवळून पाहता येत आहेत. यासाठी अंतर्गत रस्ते उभारण्यात आले आहेत. मंगळवार वगळता इतर दिवशी संग्रहालय खुले ठेवण्यात येत आहे. प्रौढांसाठी 40 रुपये प्रवेशशुल्क तर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात 25 टक्के सूट देण्यात येत आहे. कर्नाटक प्राणीसंग्रहालय प्राधिकरण वन्यजीव संरक्षणाच्या महत्त्वाविषयी आणि जागरुकतेसाठी एक शैक्षणिक केंद्रदेखील उभारले जात आहे. याचबरोबर संग्रहालयातील अंतर्गत रस्ते, इमारत, पाईपलाईन, प्राण्यांसाठी तलाव, कम्पोस्ट खत शेड उभारणे यासह इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अंतर्गत सर्व्हिस रोड, टायगर सफारी रोड, प्रवेशद्वार यासह इतर सुविधा जिल्हा पंचायत फंडातून करण्यात आल्या आहेत.