पहिल्याच खेळाला उत्तम प्रतिसाद : गोवावेस अग्निशमन कार्यालयासमोर आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
रसिकांना पोट धरून हसविण्यासाठी रॅम्बो सर्कस बेळगावमध्ये दाखल झाली आहे. बुधवारी रॅम्बो सर्कसच्या पहिल्या खेळाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन व तरुण भारतचे समूहप्रमुख किरण ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. धो धो पावसातही पहिल्या खेळाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
बेळगावकरांचे मनोरंजन करण्यासाठी 3 ते 4 वर्षांनंतर सर्कस बेळगावमध्ये आली आहे. मध्यंतरी कोरोनामुळे निर्बंध येत असल्यामुळे सर्कस येऊ शकली नव्हती. परंतु आता नेत्रदीपक कवायती पाहण्याची संधी मिळाली आहे. गोवावेस अग्निशमन विभागाच्या कार्यालयासमोर सर्कस दाखल झाली आहे. दररोज 3 खेळ दाखविले जाणार आहेत. दुपारी 1, सायंकाळी 4 व 7 वाजता हे खेळ असणार आहेत.
किरण ठाकुर म्हणाले, देशात आजवर अनेक सर्कस होत्या. त्यातील काही सर्कस कालांतराने बंद पडल्या. परंतु काहीजण मात्र सध्याच्या परिस्थितीतही जिद्दीने सर्कस चालवत आहेत. लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे यासाठी सर्कस असते. मेरा नाम जोकर या चित्रपटातून सर्कसमधील सदस्यांचे आयुष्य कसे असते, हे दाखविले आहे. बेळगावमधील नागरिकांनी आपल्या मुलांना नेत्रदीपक कसरतींची ही सर्कस दाखवावी, असे त्यांनी सांगितले.
यामध्ये जिम्नॅस्टिक खेळाचे प्रकार, जोकरची हसवणूक, कुत्रा, पोपट व इतर प्राणी व पक्ष्यांचे खेळ, रोमहर्षक कसरती सर्कसदरम्यान दाखविल्या जात आहेत. पहिल्या दिवशीच्या खेळाला मराठा बँकेचे ज्ये÷ संचालक बाळासाहेब काकतकर, संचालिका रेणु किल्लेकर, सुहास किल्लेकर, नारायण किटवाडकर यासह रॅम्बो सर्कसचे संचालक उपस्थित होते.