बँकिंग, रेल्वे, एसएससी परीक्षांसाठी मिळणार बहुमोल मार्गदर्शन
बेळगाव : ‘वेरांडा रेस कोचिंग सेंटर’चे बुधवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. गोवावेस येथील रिलायन्स पेट्रोलपंपानजीक युनियन बँकेच्या वरील मजल्यावर कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरमध्ये बँकिंग, एसएससी आणि रेल्वे भरती पूर्वपरीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील व माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार संजय पाटील म्हणाले, गुणवत्ता असली तरी ती पारखून त्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी एक माध्यम असावे लागते. ते माध्यम म्हणजे ‘वेरांडा’ आहे. आज अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्याने ते भरकटतात. बेळगावमधील विद्यार्थ्यांना वेरांडा कोचिंग सेंटरमधून उत्तम प्रशिक्षण मिळून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसह बँक व रेल्वेमध्ये चमकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शंकरगौडा पाटील यांनी वेरांडा कोचिंग सेंटरच्या सर्व संचालकांचे कौतुक करत मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे सांगितले. वेरांडा रेस कोचिंग सेंटरचे कर्नाटक राज्य प्रादेशिक व्यवस्थापक प्रदीप नायर, शिवराज बसगुंडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रेणुका सुळेभावीकर व नंदा शहा यांच्या हस्ते सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोचिंग सेंटरचे संचालक दत्ता सुळेभावीकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत झाले. प्रमोद कोळी व जस्टीन पॉल यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, सचिन गोरले यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.