वारी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल : फळदेसाई
प्रतिनिधी /सांगे
संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ, केपे यांनी आयोजित केलेल्या पंढरपूर वारीमध्ये सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे कोर्ट येथून श्री विठ्ठल मंदिर, सांगे येथपर्यंत पायी चालत आपला उत्साहपूर्वक सहभाग दर्शविला. तसेच सांगे बसस्थानकावर वारकरी मंडळाच्या स्वागतपर भाषणामध्ये वारीत सहभागी झालेल्या सर्वांना तसेच समस्त सांगेवासियांना सुख, समृद्धी व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी श्रीचरणी केली. त्याचबरोबर या वारकऱयांच्या परतीच्या प्रवासाची स्वखर्चाने सोय करणार असल्याचे फळदेसाई यांनी जाहीर केले.
पंढरपूरवारी ही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व परंपरेचा भाग आहे. भारतीय भूमी ही सुवर्ण भूमी असून देव-देवतोंनी या भूमीला पावन केले आहे. दरवषी निघणारी वारी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत फळदेसाई यांनी स्वागत करताना व्यक्त केले. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला उपस्थित राहण्यासाठी संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळ, केपे यांनी आयोजित केलेल्या या वारीला काणकोण येथून सुरुवात झाली होती. सांगे येथे पोहोचल्यावर या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱयांचे भव्य स्वागत करण्यात आले.
या वारीमध्ये यावेळी दीपक नाईक, प्रकाश नाईक, पंढरीनाथ कर्पे, गजानन मसूरकर, नारायण मसूरकर, चिरंजय रायकर, संजय रायकर, संजीव गोवेकर, साईदीप गोवेकर, सुदेश नार्वेकर, डॉ. गुरू नाईक, लक्ष्मण बोरकर, धर्मू करमळकर व इतर मान्यवर सहभागी झाले. विठ्ठल मंदिराकडे वारी आल्यावर मंदिराचे अध्यक्ष संजय करमळकर यांनी स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले. याप्रसंगी डॉ. गुरुदास नाईक म्हणाले की, ही वारी दररोज पंचवीस किलोमीटर अंतर कापणार आहे. या वारीला यंदापासून सुरुवात करण्यात आली असून त्यात पुरुष व महिला मिळून 50 वारकरी सहभागी झाले आहेत.