बेल्जियमच्या जंगलात 75 वर्षांपासून 500 हून अधिक वाहने
जगात अशी अनेक ठिकाणे असतात, जी कुठल्या न कुठल्या कारणासाठी प्रसिद्ध असतात. अशा ठिकाणांना भेट देण्याचे औत्सुक्य लोकांमध्ये असते. परंतु जगातील तीन बेवारस ठिकाणांची कहाणी जाणून घेतल्यावर दंग व्हायला होते.
माणसांची दफनभूमी तुम्ही पाहिली असेल, परंतु कधी गाडय़ांची अंत्यभूमी पाहिली आहे का? बेल्जियमच्या दक्षिण भागात चटिलोन नावाचे ठिकाण असून येथील जंगलांमध्ये तुम्हाला शेकडो वाहने उभी असल्याचे दिसून येईल. ही वाहने मागील 75 वर्षांपेक्षा अधिक काळापासून येथे उभी आहेत. अनेक वर्षे निघून गेल्यामुळे या वाहनांमधून आता रोप-झाडं उगवली आहेत.
दुसऱया महायुद्धादरम्यान अमेरिकेचे सैनिक येथे आले होते, तेथून त्यांना पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकला नव्हता. याचदरम्यान सर्व सैनिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा इशारा मिळाला होता. परंतु या वाहनांसह कुठल्याही सुरक्षितस्थळी जाणे शक्य नसल्याने या सैनिकांनी स्वतःची वाहने येथेच सोडून देत बंकर्समध्ये धाव घेतल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.
अमेरिकेचे सैनिक पुढील काळात स्वतःची वाहने नेण्यासाठी परत येतील असे मानले जात होते, परंतु ही वाहने अमेरिकेत परत नेण्याचा खर्च या वाहनांच्या किमतीपेक्षा अधिक असल्याने हा विचार सोडून देण्यात आला होता. अनेक वर्षे उलटून गेल्यावरही ही वाहने अद्याप तशीच उभी आहेत, या वाहनांकडे पाहिल्यास ती एखाद्या ट्रफिक जाममध्ये अडकून पडली असावेत असे वाटते. जंगलात उभ्या करण्यात आलेल्या वाहनांची संख्या 500 हून अधिक आहे.