अमेरिकेकडून 40 कोटी डॉलर्सची मदत : ब्रिटनही 10,000 तोफगोळे पाठवणार
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिका युपेनला 40 कोटी डॉलर्सचे मदत पॅकेज पाठवत असल्याची माहिती नुकतीच व्हाईट हाऊसने दिली. त्याचबरोबर ब्रिटनही युपेनला एक मदत पॅकेज पाठवत असून त्यामध्ये 10,000 अतिरिक्त तोफगोळय़ांचा समावेश आहे. या युद्धसामुग्रीची मदत युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी होणार आहे.
24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून सुरू झालेले युद्ध अजूनही सुरू आहे. युक्रेनला या लढय़ात आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी मदत मिळत असल्याने त्यांनी अद्याप हार पत्करलेली नाही. याउलट रशिया हा मोठा देश असूनही या लढाईत तो बॅकफूटवर आलेला दिसत आहे. दोन्ही देशांच्या युद्धसामुग्रीचे मोठे नुकसान होण्याबरोबरच जीवितहानीही झालेली आहे. आक्रमणानंतर अमेरिकेने युपेनला 19 अब्ज डॉलरहून अधिक शस्त्रे आणि इतर उपकरणे पाठवली आहेत. त्यात आता या नवीन मदत पॅकेजची भर पडली आहे. ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वेल्स यांनी बुधवारी नॉर्वे दौऱयावर असताना अतिरिक्त 40 कोटींची मदत करण्याची घोषणा केली. तसेच ब्रिटन सरकारने अतिरिक्त तोफगोळे पाठविण्याचे जाहीर करत ही मदत युपेनची संरक्षणात्मक क्षमता वाढवतील, असे स्पष्ट केले. याशिवाय ‘सी किंग’ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मोठय़ा शोध आणि बचाव कार्यासाठी युपेनला पाठवली जाणार आहे.
अलीकडेच ब्रिटनने लष्करी मदत म्हणून लेझर-मार्गदर्शित ब्रिमस्टोन क्षेपणास्त्राचे अद्ययावत मॉडेल युपेनला पाठवले होते. याची मारक क्षमता मागील डिझाईनच्या दुप्पट आहे. रशियन सैन्याला मागे ढकलण्यात मदत करण्यासाठी युपेनला रॉयल एअर फोर्सद्वारे ब्रिमस्टोन-2 क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला जात असल्याचे फुटेज समोर आले आहे. इराणनिर्मित शहीद-136 ड्रोनच्या वाढत्या हल्ल्यात ब्रिमस्टोन क्षेपणास्त्र खूप प्रभावी ठरले आहे. ब्रिटनने सहा महिन्यांपूर्वी युपेनला ब्रिमस्टोन क्षेपणास्त्रे दिली होती. या युद्धसामग्रीमुळे रशियन सैन्याच्या शस्त्रास्त्रांचे मोठे नुकसान झाले होते.