अमेरिकेच्या सैन्याधिकाऱयाने भारताला केले सतर्क
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
लडाखनजीक चीनच्या कारवाया डोळे उघडणाऱया आहेत. लडाखमध्ये चीनकडून निर्माण करण्यात येत असलेल्या काही पायाभूत सुविधा भीती वाढविणाऱया आहेत असे उद्गार अमेरिकेच्या सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने काढले आहेत. अमेरिकन सैन्याच्या पॅसिफिक कमांडचे कमांडिंग जनरल चार्ल्स ए. फ्लयन यांनी हिमालयाला लागून असलेल्या सीमेवर चीनच्या सैन्याच्या तयारीवरून हा इशारा दिला आहे. चीनचे हे ‘अस्थिर करणारे आणि दबाव वाढविणारे’ वर्तन असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.
चिनी कारवाया सतर्क होण्यास भाग पाडणाऱया आहेत. पश्चिम थिएटर कमांडमध्ये तयार केल्या जाणाऱया सैन्याशी निगडित पायाभूत सुविधा भीती वाढविणाऱया आहेत. चीनचे या क्षेत्रातील घातक मार्गावर जाणारे, अस्थिरता वाढविणारे आणि दबाव निर्माण करणारे वर्तन त्यालाच नुकसानकारक ठरणार असल्याचे जनरल चार्ल्स यांनी म्हटले आहे.
भारत अन् अमेरिकेचा संयुक्त सराव
चीनच्या दबाव वाढविणाऱया वर्तनाला आम्ही एकत्र मिळून काम करत प्रत्युत्तर देऊ शकतो. भारत आणि अमेरिका दोघेही पर्वतीय भागांमध्ये प्रशिक्षण आयोजित करणार आहेत. सुमारे 9 हजारपासून 10 हजार फुटांच्या उंचीपर्यंत हिमालयात हे संयुक्त प्रशिक्षण होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हे पार पडणार आहे. दोन्ही देशांचे सैन्य अत्यंत थंड हवामानात युद्धाभ्यास करणार असल्याचे जनरल चार्ल्स म्हणाले. या संयुक्त सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांची पर्वतीय क्षेत्रातील युद्धक्षमता वाढविणे आहे. या सरावात नवे तंत्रज्ञान, वायुदलाची शस्त्रास्त्रs आणि रियल टाइम गुप्तचर माहिती जमा करणे सामील असेल.
चीनसोबत तणाव
चीन पँगोंग सरोवरावर दुसरा पूल तयार करून रणगाडय़ांसारख्या अवजड शस्त्रास्त्रांना भारतीय सीमेनजीक वेगाने हलविण्याची व्यवस्था करत आहे. चीनने लडाखला लागून असलेल्या स्वतःच्या नियंत्रणातील भागात वायुतळांची क्षमता वाढविली आहे. यामुळे भारतासाठी पूर्ण हिमालयीन क्षेत्रात थेट मोठा धोका निर्माण झाला आहे. भारत आणि चीन यांच्यातील अनेक टप्प्यांमधील चर्चेनंतरही दोन्ही देशांमधील तणाव कमी झालेला नाही.