वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना जौहर विद्यापीठप्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. जौहर विद्यापीठामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय कारवाई सध्या केली जाऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जामिनाच्या स्वरुपात 13.8 हेक्टर भूमी जिल्हाधिकाऱयांच्या स्वाधीन करण्याच्या अटीला स्थगिती दिली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामिनासाठी ठेवण्यात आलेली अट प्राथमिक दृष्टय़ा गैर वाटते. आरोपींची उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या साधनांशी याचा कुठलाही थेट संबंध नसल्याचे न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि बेला माधुर्य त्रिवेदी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावून उत्तरप्रदेश सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला याप्रकरणी भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
आझम खान हे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर पडले आहेत. सुमारे 27 महिने ते तुरुंगात होते. आझम यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.