कॅनडाकडून आयात शुल्क हटविण्याची घोषणा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे रशियाच्या हल्ल्यानंतर अचानक युक्रेनमध्ये पोहोचले आणि त्यांनी उद्ध्वस्त इरपिन शहराचा दौरा केला आहे. युक्रेनमधील ‘सस्पिलने’ हा माध्यम समूह आणि इरपिन शहराचे महापौर ओलेक्जेंद्र मार्पुशिन यांनी ट्रुडो यांच्या दौऱयाची माहिती दिली. कॅनडाने युक्रेनमधून आयात होणाऱया सर्व सामग्रीवरील शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 8 मे रोजी कीव्हमध्ये अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आर्थिक दिलासा देणारी घोषणा केली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान नागरिकांची उद्ध्वस्त घरे पाहून स्तब्ध झाल्याचे मार्पुशिन यांनी ट्रुडो यांचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. युद्धाच्या प्रारंभी कीव्हवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात रशियाच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात इरपिन शहराचे भीषण नुकसान झाले होते. ट्रुडो यांच्या कार्यालयाने त्यांच्या युक्रेन दौऱयाची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान हे युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. युक्रेनच्या लोकांबद्दल कॅनडाचे समर्थन पुन्हा अधोरेखित करण्यात आल्याचे ट्रुडो यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
जर्मनीच्या संसद अध्यक्षांचा दौरा
युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी रविवारी जर्मनीच्या संसदेच्या अध्यक्षा बारबेल बास यांची भेट घेतली आहे. बास या युक्रेनच्या दौऱयावर आहेत. दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्य आणि रशियावरील निर्बंधांवरून चर्चा केली आहे. झेलेंस्की यांच्या कार्यालयाने याची पुष्टी दिली आहे. जर्मनीकडून मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वाची युक्रेनला अपेक्षा आहे. जर्मन सरकारकडून युक्रेनला अवजड शस्त्रास्त्रs देण्याची तरतूद करण्यात आल्याने आम्ही आभारी आहोत. युरोपीय महासंघाचे सदस्यत्व प्रदान करण्यासाठी जर्मनीचे समर्थन युक्रेनला मिळेल, असा विश्वास असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी जर्मनी शक्य ते सर्व काही करणार आहे. यात युरोपीय महासंघात त्याला सामील करण्यासाठी समर्थन देणे आणि पुनर्निर्मितीत साहाय्य प्रदान करणे सामील असल्याचे बास यांनी म्हटले आहे.