पहिल्याच दिवशी 124 प्रवाशांचा प्रवास : विमानाचे वॉटर सॅल्यूटद्वारे स्वागत
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर रविवारपासून सकाळची विमानफेरी सुरू झाली. या विमानफेरीला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला. 63 प्रवासी बेंगळूरहून बेळगावला आले तर 61 प्रवासी बेळगावहून बेंगळूरला गेले. असा उत्तम प्रतिसाद दिल्याने विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांचे आभार मानण्यात आले.
इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून सकाळीही विमानफेरी सुरू केली. 78 आसन क्षमता असणारे विमान आता संध्याकाळसोबतच सकाळीही सेवा देणार आहे. त्यामुळे बेंगळूरला जाणाऱया प्रवाशांसाठी दररोज दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. या विमानफेरीचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडले.
विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य व व्यवस्थापक रोसिना यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. खासदार मंगला अंगडी यांनी इंडिगोचे आभार मानत या विमानफेरीमुळे बेळगावच्या विकासाला हातभार लागेल, असे सांगितले.
बेंगळूरहून बेळगावला आलेल्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. तसेच पहिल्या प्रवाशांना केक भरवून आनंद साजरा करण्यात आला.