वृत्तसंस्था/ उलानबातार, मंगोलिया
येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तीन ग्रीको रोमन मल्लांनी कांस्यपदके मिळविली. त्यात सुनील कुमार व अर्जुन हलकुर्कीचाही समावेश आहे.
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्याची सुनील कुमारची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2020 मध्ये त्याने 87 किलो गटात सुवर्णपदक मिळविले होते. 23 वर्षीय सुनील कुमारने मंगोलियाच्या बतबायर लुतबायरविरुद्ध झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सुरुवातीलाच 5-0 अशी आघाडी मिळविली आणि नंतर तांत्रिक सरसतेच्या आधारे तो विजयी झाला. त्याआधी उपांत्य लढतीत सुनील कुमारला उझ्बेकिस्तानच्या जलगॅसबे बेर्डिमुरातोव्हकडून तांत्रिक सरसतेच्या आधारे पराभव स्वीकारावा लागला होता. त्याने या स्पर्धेत जपानच्या मासातो सुमीविरुद्ध 5-3 असा विजय मिळवित चांगली सुरुवात केली होती.
55 किलो गटाच्या लढतीत भारताच्या अर्जुन हलकुर्कीने दवाबंदी मुन्ख एर्डीनवर 10-7 असा विजय मिळवित कांस्य पटकावले. 2020 मध्येही त्याने कांस्यपदक मिळविले होते. 63 किलो गटात नीरजने उझ्बेकिस्तानच्या इस्लोमजोन बख्रामोव्हला 7-4 असे हरवित कांस्य जिंकले. उपांत्यपूर्व फेरीत त्याला किर्गीझस्तानच्या टायनार शार्शेनबेकोव्हकडून हार पत्करावी लागल्यानंतर त्याला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. शार्शेनबेकोव्हने या प्रकारात सुवर्ण मिळविले. साजन भनवालला मात्र 77 किलो गटातील कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या कोदाय सकुराबाकडून थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. 130 किलो गटात प्रेम कुमारला पहिल्याच लढतीत 0-5 असा इराणच्या अमिर मोहम्मदअली घासेमिमोनजाझीकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला.