प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक वाचनालयातर्फे साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे सदस्य आणि माजी महापौर गोविंदराव राऊत यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले. वाचनालयाचे अध्यक्ष नेताजीराव जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह लता पाटील, प्रा. विनोद गायकवाड प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
प्रा. गायकवाड म्हणाले, साने गुरुजी हे थोर द्रष्टे देशभक्त होते. समाजातील सर्व घटकांचे कल्याण साधण्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन दीनदलितांसाठी खुले व्हावे, यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. त्यामुळे सर्वांनाच देवदर्शन घडू लागले. एका अर्थाने देवाच्या दरबारातील विषमता त्यांनी नष्ट केली.
त्यांचे साहित्यिक योगदानही खूप मोलाचे आहे. त्यांच्या कथा, कादंबऱया व वैचारिक पुस्तके सर्वच संस्कारशील आहेत. भारतीय साहित्यात त्यांचे ‘शामची आई’ हे पुस्तक अढळस्थानी आहे. या पुस्तकाने अनेक पिढय़ा सुसंस्कारित केल्याचे त्यांनी नमूद केले.
नेताजी जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सुनीता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले. संचालक अभय याळगी, अनंत जांगळे, ऍड. अमर यळ्ळूरकर, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.