महालवाडा प्रभागातून बिनविरोध निवड निश्चित : काणकोणात 7 पंचायतींसाठी 201 अर्ज ग्राहय़
प्रतिनिधी /काणकोण
पैंगीण पंचायतीच्या महालवाडा वॉर्डातून बिनविरोध निवड निश्चित झाल्याबद्दल सभापती रमेश तवडकर आणि काणकोण भाजप मंडळाने सुनील पैंगणकर यांचे अभिनंदन केले आहे. पैंगणकर यांनी सभापती तवडकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, 26 रोजी उमेदवारी अर्ज छाननीनंतर 40 उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. एकूण 7 पंचायतींच्या 59 वॉर्डांसाठी 201 उमेदवारी अर्ज ग्राह्य़ धरण्यात आले असल्याची माहिती काणकोणचे निर्वाचन अधिकारी मनोज कोरगावकर यांनी दिली. त्यात खोल 34, आगोंद 24, श्रीस्थळ 38, पैंगीण 26, लोलये पोळे 31, गावडोंगरी 26 आणि खोतीगाव येथील 22 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्यानंतर स्पष्ट चित्र समोर येणार आहे.