जत पंचायतीत खळबळ : अनेकांचे धाबे दणाणले : पंधरा हजाराची लाच घेताना ताब्यात
प्रतिनिधी/जत
शिक्षकाच्या अर्जित रजेसाठी जत पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी तथा सहाय्यक बीडीओ व सह शिक्षक यांच्या संगनमताने तब्बल साठ हजाराची लाच मागणारे प्रभारी गटशिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे व सहशिक्षक कांताप्पा सन्नोळी या दोघांना सांगली लाचलुचपत विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. या घटनेने जत पंचायत समिती व शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय अशी प्रकरणे हाताळणाऱया अन्य कांहींचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
जत तालुक्यातील एका शिक्षकाची तीन महिन्याची अर्जित रजा होती. या रजेच्या कामासाठी प्रभारी गटशिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे व त्यांचा एजंट सहशिक्षक कांताप्पा सन्नोळी यांनी संबधीत शिक्षकाकडे साठ हजार रूपये मागितले होते. या पैशाच्या मागणीनंतर संबधीत तक्रारदाराने 6 सष्टेंबर रोजी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सहा तारखेपासून अधिकाऱयांनी पडताळणी सुरू केली होती.
दरम्यान, तीन महिन्याच्या अर्जित रजेसाठी ठरलेल्या साठ हजारापैकी प्रत्येक महिन्याच्या पगारानंतर 15 हजार याप्रमाणे 45 हजार रूपये देण्याचे ठरण्यात आले होते. त्यापैकी पंधरा हजार रूपये शुक्रवार 14 रोजी गटशिक्षण अधिकारी यांचे मध्यस्थ सहशिक्षक कांताप्पा सन्नोळी (जि.प. शाळा सिंधीहाळ वस्ती मुंचडी) यांच्याकडे देत असताना, अधिकाऱयांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे आपल्या मंगळवेढा तालुक्यातील डोणज या गावी जात असताना जत पूर्व भागातील एका गावात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जत पोलीसात याची नोंद करण्यात आली आहे.
पंचायत समितीत खळबळ
जत पंचायत या घटनेने मोठी खळबळ उडाली. दुपारी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागात छापा पडल्याची जोरदार चर्चा उठली. त्यानंतर शिक्षण विभागात झाल्याचे समजले. परंतु या घटनेने जत पंचायत समितीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. शिक्षण विभागात मोठय़ा भानगडी असल्याची चर्चा अनेक दिवसापासून होती. मोठा नोकरदार वर्ग या विभागात असल्याने अशा कांही प्रकरणात जत पासून सांगली पर्यंत अनेकांचे लागेबांधे आहेत. पण छाप्याने अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.