चोवीस तासांत 104 नवे रुग्ण : सक्रिय रुग्णांचा आकडा 549 वर.प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज
प्रतिनिधी /पणजी
कोरोनाच्या नवीन रुग्णांनी एका दिवसांत अचानक शंभरी गाठली असून गेल्या चोवीस तासांत 104 रुग्णांची नोंद झाली आहे. इतके दिवस दुहेरी संख्येने रुग्ण सापडत होते. ते आता तिहेरी संख्येवर गेल्याने चिंता वाढली असून एकुण सक्रिय रुग्णांचा आकडा 500 च्या वर जाऊन 549 झाला आहे.
दोन महिन्यांनंतर सोमवारी एक बळी गेला. त्याचबरोबर दोघांना इस्पितळात भरती करावे लागल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी शतक पार रुग्णसापडल्याने भीतीमध्ये आणखी भर पडली.
कोरोनाचा वाढता संसर्ग
मंगळवारी दिवसभरात सापडलेल्या 104 पैकी एका रुग्णाला इस्पितळामध्ये भरती करण्यात आले असून उर्वरित 103 जणाना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. मंगळवारी 1262 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यात 104 जाणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा कल एकंदरित वाढत असल्याचे चित्र असून कोरोनाची चौथी लाट गोव्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
प्रतिबंधक उपायांची गरज
सरकारने कोरोनाचा हा वाढता संसर्ग गंभीर्याने घेण्याची गरज असून अजुनही कोरोना संदर्भात कोणतेही प्रतिबंधक उपाय योजना आखण्यात आलेल्या नाहीत. गोव्यात येणारे पर्यटक विनामास्क खुलेआम फिरत असून कोरोनाची कोणतीच बंधने नसल्याने पर्यटकांसह स्थानिक जनताही बिनधास्त असल्याचे समोर येत आहे. मोठय़ा प्रमाणात एकत्र जमण्याचे अनेक प्रकार ग्रामीण तसेच शहरी भागात सर्रास घडत असून त्याठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला असतो.
मंगळवारी दुपटीने रुग्णवाढ
जून 2020 पासून आतापर्यंत मिळून एकूण 246612 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 242230 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एका दिवसांत कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. सोमवारी 13 जून रोजी 44 नवीन रुग्ण सापडले होते, तर मंगळवारी 14 जूनला दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 104 जण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचेच हे चित्र आहे.