1.44 लाख कोटीपार, जून 2021 च्या तुलनेत 56 टक्के वाढ
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या चार महिन्यांपासून सलग वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात समाधानकारक प्रगती दिसत आहे. गुरुवारी संपलेल्या जून महिन्यात हे करसंकलन 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. जून 2021 पेक्षा ते 56 टक्के अधिक आहे. जीएसटी दिनाच्या समारंभात ही माहिती देण्यात आली.
जून 2021 मध्ये जीएसटीचे संकलन 92,800 कोटी रुपयांचे होते. ते नुकत्याच संपलेल्या जूनमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले. गेले सलग चार महिने हे संकलन 1.40 लाख कोटी रुपयांच्या वर झालेले आहे. त्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षात देशाचे करउत्पन्न चांगल्या प्रकारे वाढलेले दिसून येणार आहे.
आयात शुल्कातून अधिक उत्पन्न
भारताची आयात आणि निर्यात हे दोन्ही वाढले असून आयातीतून मिळणाऱया जीएसटीमध्ये गेल्यावर्षीच्या जूनच्या तुलनेत 55 टक्के वाढ झाली. तर देशांतर्गत व्यापारातून होणाऱया करसंकलनात 56 टक्के वाढ दिसून आली. या जूनमध्ये एकंदर 7.3 कोटी ई-वे बिल्स तयार करण्यात आली. ही संख्या गेल्या जूनपेक्षा अधिक आहे. मात्र एप्रिल 2022 पेक्षा 2 टक्के कमी आहे. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींकडून भलावण
जीएसटी व्यवस्थेमुळे करयंत्रणेत मोठी सुधारणा झाली, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही करप्रणाली लागू करणे हे धाडसाचे पाऊल होते. अनेकांचा याला विरोध होता. ही व्यवस्था लागू झाल्यास करसंकलन घटेल, अशी भीती दाखविण्यात येत होती. तथापि, याच्या उलट घडत आहे. या करसंकलनात अधिकाधिक वाढच होत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. 1 जुलै 2017 या दिवशी वस्तू-सेवा करप्रणालीचा (जीएसटी) प्रारंभ करण्यात आला होता. आता या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांचे भाषण झाले.