Tarun Bharat

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रीपदासाठीच आघाडी

पालकमंत्री दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप : जिल्ह्य़ात सहा आमदार निवडून आणण्याचे हिंदूगर्वगर्जनेत आवाहन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

सत्ता, मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. नेतृत्त्व मुख्यमंत्री होतयं म्हणून ही आघाडी शिवसैनिकांनी मान्य केली. नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात जावून पुढील आमदार राष्ट्रवादीचाच असा प्रचार सुरु केला. ही बाब नेतृत्त्वाच्या निदर्शनास आणून देवूनही याकडे दूर्लक्ष केले. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात रस्त्यावरील लढाई करत शिवसेना मोठी झाली, त्यांच्याच दावणीला शिवसेना बांधली जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा भाजप सोबत युती केल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्यावतीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथे हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, रस्त्यावरील लढाई करताना अनेक शिवसैनिकांवर केसेस झाल्या. तरीही मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरुन काँगेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. भाजपसोबत केलेली युती बाळासाहेबांनी केलेली युती होती. मात्र कोणीतरी उठतो हिंदूत्वाचे विचार मांडण्याऐवजी दिल्लीवर, मित्र पक्षावर बोलतो. अशावेळी पक्षाच्या हितासाठी त्यांना थांबवणे आवश्यक असते. मात्र असे न झाल्याने आज ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप मंत्री केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केला.

मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, युवा सेना राज्य कार्यकारीणी सदस्य किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. चेतन शिंदे, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

छत्रपतींच्या वारसासोबत करार करता
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि कार्यातून शिवसेना अस्तित्वात आली. ज्यांच्या नावाने राजकारणात आला, आज त्यांच्या वारसांसोबत करार करता त्यांना वेगळी ट्रिटमेंट देता याला शिवसेना कशी म्हणायची, असा टोलाही पालकमंत्री यांनी लगावला.

हिंदुत्वाच्या विचारासाठी बीकेसीवर चला
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. याच शिकवणीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार खऱया अर्थाने पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. त्यामुळे मुंबईमधील बीकेसी मैदानावर होणार दसरा मेळावाच खरा शिवसेनेचा मेळावा आहे. त्यामुळे हिंदूत्वाचा विचार जोपासण्यासाठी बीकेसी मैदानावर चला, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.

सहा आमदार हिच बाळासाहेबांना आदरांजली
विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्ष आहेत. याकाळात अशी विकासकामे करा की, पुढील निवडणुकीत जिल्हय़ात पुन्हा सहा आमदार शिवसेनेचे निवडून येतील. याकाळात पालकमंत्री म्हणून माझेही पाठबळ शिवसैनिकांना राहिल. सहा आमदार निवडून येणे हिच खरी बाळासाहेबांना आदरांजली असणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

Related Stories

“भित्र्या सेलिब्रिटींनो, कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा ?”

Archana Banage

दिलासा…विक्रमी 1280 जणांना डिस्चार्ज

Patil_p

कोल्हापूर : शिवपुतळा विटंबना करणाऱ्याला तत्काळ अटक करा; सर्वपक्षीय संघटनांची मागणी

Archana Banage

वन्य जीवांवर होणारे मानवी आक्रमण थांबवा

Patil_p

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार : चंद्रकांत पाटील

Tousif Mujawar

पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे निधन

datta jadhav
error: Content is protected !!