प्रतिनिधी / बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला एकदिवसीय प्रेरक अभ्यासभेटीचा भाग म्हणून गोपालजी पी. यू. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि देवेंद्र जिनगौडा हायस्कूल, शिंदोळीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी गोपाल जिनगौडा फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल डी. जीनगौडा, सचिव, प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि कर्मचारी उपस्थित होते. या भेटीसाठी कर्नल बिस्वास यांचे सहकार्य लाभले.
एमएलआयआरसी बेळगावचे डेप्युटी कमांडंट कर्नल स्वप्नील टी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय संरक्षण सेवेत कसे सामील व्हावे आणि सैनिकांच्या जबाबदाऱ्या याविषयी तसेच पीयूच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अग्निवीर’ या नवीन सैन्य योजनेची विस्तृत माहिती दिली.
व्यवस्थापन सदस्य आणि कर्मचारी यांनी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचीही भेट घेतली. जॉयदीप यांनी विद्यार्थ्यांना लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले. या भेटीबद्दल व्यवस्थापन मंडळाने एमएलआयआरसीला धन्यवाद दिले.