Tarun Bharat

स्वातंत्र्यदिनासाठी गाईडलाईन्स

Advertisements

केंद्र सरकारकडून राज्यांना दिशानिर्देश जारी ः कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता गर्दी टाळण्याचा सल्ला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारमार्फत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने राज्यांना स्वातंत्र्यदिनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. भारत यावषी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. मात्र, देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या समारंभावेळी जास्त गर्दी करू नये, तसेच मोठे समारंभ आयोजित केले जाऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या देशात दररोज सरासरी 15,000 हून अधिक कोरोनाव्हायरस प्रकरणांची नोंद होत असल्याने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी लोकांनी एकत्र येताना मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच सामाजिक अंतर पाळून कार्यक्रम करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

‘स्वच्छ भारत’ मोहीम राबवण्याची सूचना

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जिह्यातील प्रमुख ठिकाणी ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यास सांगितले आहे. हे अभियान जिल्हा पातळीवर पंधरवडा किंवा महिनाभर चालविण्यासही हरकत नसल्याचे स्पष्ट करत हे ऐच्छिक असल्याचे सांगितले आहे. यासोबतच सरकारी विभाग आणि शैक्षणिक संस्थांना पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे.

लसीकरणाला गती

कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढत असतानाच देशात लसीकरणाचा वेगही वाढत आहे. कोरोना विषाणूला पराभूत करण्यासाठी सरकारने आता लसीकरणाची गती वाढवल्यामुळे भारतात लसीचे एकूण 207 कोटी डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 102 कोटींहून अधिक लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर सुमारे 94 कोटी लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. आता बुस्टर डोस घेणाऱयांची संख्याही वाढली आहे.

दिवसभरात 16,561 नवीन कोरोना रुग्ण

गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 16,561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय प्रकरणे देखील 1  लाख 23 हजार 535 पर्यंत वाढली आहेत. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 49 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असून एकूण मृतांचा आकडा 5 लाख 26 हजार 928 वर पोहोचला आहे.

Related Stories

गगनयान कार्यक्रमात इस्रोला मोठे यश

Amit Kulkarni

गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम

Patil_p

भारताच्या विकासात अभियंत्यांचे मोठे योगदान

Patil_p

मोदींनाही द्यावे लागणार ‘नो-कोविड’ प्रमाणपत्र

Patil_p

आयुर्वेदिक-होमिओपॅथिक डॉक्टरांना मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा

Patil_p

काँग्रेस अन् तेजप्रतापांकडे तेजस्वींची पुन्हा डोळेझाक

Patil_p
error: Content is protected !!