वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची माहिती ः हंगामासाठी 60 लाख टन निर्यात कोटा निश्चित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2022-23 साठी 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्यात आल्यानंतर आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी रविवारी या क्षेत्रासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे ट्विट केले. चालू हंगामादरम्यान ही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले. या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आली आहे.
सरकारने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाजवी मर्यादेपर्यंत साखर निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, सरकारने साखर कारखान्यानुसार निर्यातीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022-23 च्या निर्यातीसाठी 6 दशलक्ष म्हणजेच 60 लाख टन इतका निर्यात कोटा निश्चित केला आहे. ही साखर निर्यात मर्यादा कच्ची, पांढरी तसेच रिफाइंडच्या सर्व श्रेणींमधील आहे. साखर कारखानदारांनी मिळवलेले साखरेचे सरासरी उत्पादन लक्षात घेऊन गेल्या तीन साखर हंगामांमध्ये 60 लाख टन निर्यात कोटा सुनिश्चित करण्यात आला आहे.
सर्व साखर कारखान्यांना हंगामातील त्यांच्या अंदाजित साखर उत्पादनाच्या 18.23 टक्के एकसमान निर्यात कोटा वाटप करण्यात आला होता. संबंधित ऊस आयुक्तांनी रितसर पडताळणी केल्यानंतर हे प्रमाण ठरविण्यात आल्याचे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कारखाने स्वतः किंवा निर्यातदार किंवा रिफायनरीजद्वारे साखरेचे प्रमाण निर्यात करू शकतात. जे कारखाने 31 मे 2023 पर्यंत आपल्या निर्यात कोटय़ाच्या 90 टक्के वाटा पाठवू शकत नाहीत त्यांच्यासाठी वाटप केलेल्या कोटय़ांपैकी 30 टक्के निर्यात न केलेले प्रमाण त्यांच्या जुलै/ऑगस्ट 2023 च्या मासिक देशांतर्गत कोटय़ातून वजा केले जाणार आहे. या आदेशाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत कारखान्यांना आपला निर्यात कोटा (अंशतः/संपूर्ण) इतर कोणत्याही साखर कारखान्याच्या देशांतर्गत कोटय़ात बदलता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
साखर कारखान्यांचा निर्यात कोटा कस्टम अधिकारी हे सुनिश्चित करतील असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. व्यापारी निर्यातदार/रिफायनरी यांच्यात द्विपक्षीय/त्रिपक्षीय करार करून समूहाच्या कोणत्याही कारखान्यातून साखर निर्यात केली जाऊ शकते. निर्यातदार किंवा साखर कारखाने केवळ साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा निर्यात करू शकतात आणि खुल्या बाजारातून किंवा कारखान्याच्या देशांतर्गत कोटय़ातून खरेदी केलेली साखर कोणत्याही साखर कारखान्याने/निर्यातदार किंवा रिफायनरीद्वारे निर्यात करण्याची परवानगी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.