टॅक्सी चालकांविरुद्ध मुख्यमंत्र्यांचा एल्गार
प्रतिनिधी/ पणजी
मुरगाव बंदरात उतरलेल्या जहाजावरील विदेशी पर्यटकांना घेऊन गोवा दाखविण्यास नेणाऱया बस चालकाला अडवून सर्वांसमक्ष त्याच्या कानशीलात लगावून दादागिरी करणाऱया टॅक्सी चालकांविरुद्ध गोवा सरकारने एल्गार जारी केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. ज्या पर्यटकांना त्रास झाला त्या पर्यटकांबाबत मंत्री रोहन खंवटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. टॅक्सीवाल्यांची ही दादागिरी खपवून घेणार नाही, कारवाई करूच असे जाहीर केले.
गेले कित्येक दिवस टॅक्सीवाल्यांनी सुरू केलेल्या दादागिरीविरोधात आता सरकारनेही आपले अस्त्र बाहेर काढले आहे. वास्को येथे बुधवारी मुरगाव बंदरात आलेल्या जहाजावरील पर्यटकांना गोवा पहाण्याची इच्छा होती. यामुळे या पर्यटकांना गोवा दाखविण्याकरीता एका पर्यटन क्षेत्रातील संस्थेने बसेसची व्यवस्था केली होती. या बसेसमुळे टॅक्सी चालकांना भाडे मिळाले नाही म्हणून काही टॅक्सी चालकांनी जोरदार भांडणे काढली. बसेस अडविल्या आणि विदेशी पर्यटक बसलेल्या बसचालकाला शिवीगाळ करून त्याच्या कानशिलात लगावली आणि बराच गोंधळ घातला. परिणामी बसमध्ये बसलेले विदेशी पर्यटक घाबरले. गोव्यात अशी दादागिरी चालते हे पाहून ते बसमधून पुन्हा उतरले व जहाजात जाऊन बसले.
या घटनेने पर्यटन क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. गोव्यात टॅक्सी वाल्यांची दांडगाई वगैरे संदेश सर्वत्र पसरले. विदेशातून अनेक पर्यटक गोव्यात येणार असल्याने या प्रकाराने विदेशातून येणारे पर्यटक गोवा दौरा रद्द करतील, अशी भीती पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांनी व्यक्त केली.
असे प्रकार मुळीच खपवून घेणार नाही ः मुख्यमंत्री
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीस पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज हे देखील उपस्थित होते. टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीवर गंभीरपणे चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकारणाची चौकशी करावी व ज्या कोणी टॅक्सीवाल्यानी हे कृत्य केलेले असेल त्यांना ताबडतोब अटक करण्यास सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सीवाल्यांचे हे कृत्य निषेधार्ह आहे. असले प्रकार मुळीच खपवून घेणार नाही. आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
टॅक्सीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही ः खंवटे
संतप्त बनलेले पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत टॅक्सीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करीत असताना अशा पद्धतीची दादागिरी सहन करण्यापलिकडची आहे. आता दादागिरी करणाऱया टॅक्सी चालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षक धनिया यांनी विदेशी पर्यटकांच्याबाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करून असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नसल्याचे म्हटले आहे. मुरगाव बंदरात अनेक क्रूझ जहाजे दाखल होत असतात. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता. सर्व व्यवस्था पोलीस व इतर संबंधीत आधीच बैठक घेऊन ठरवत असतात. हा व्यवहार दरवेळी सुरळीतपणे हाताळला जातो. मात्र, गुरुवारचे ाश प्रकरण हे योग्य संपर्क आणि माहितीअभावी घडलेले आहे. कोर्डीयला इप्रेस व नॉटीला ही दोन क्रूझ पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाली होती. सर्व काही ठरल्याप्रमाणे सुरळीतपणे झाले होते. मात्र, तिसऱया जहाजाची कल्पना फारशी कुणाला नव्हती. या जहाजाबाबतची प्रक्रिया उशिरा झालेली होती. त्यामुळेच हा चुकीचा प्रकार घडलेला असल्याचे चौकशीत आढळून आलेले आहे. योग्य प्रक्रियेअभावी सदर लक्झरी कोचना सुरक्षा दलाने बंदरात प्रवेश करण्यास दिले नव्हते. गैर व्यवस्थापनामुळे हे घडलेले आहे. परंतु परिस्थिती काहीही असली तरी या पुढे पर्यटकांना त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. गोवा हे एक सुरक्षित आणि चांगले पर्यटनस्थळ आहे ही प्रतिमा जपायला हवी. तिला डाग लागता कामा नये याची जाणीव टॅक्सी व्यवसायिकांनी ठेवावी. पर्यटकांवरच पर्यटन व्यवसाय चालतो. पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी काही नवीन निर्णय घेण्यात आलेले असल्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी स्पष्ट केले.