ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
चालू वर्षाअखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका (assembly election in gujarat) होणार आहेत. भाजपने मागील 27 वर्षापासून गुजरातमध्ये असलेली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारी गुजरातमधील 500 डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गांधीनगर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकाच वेळी 500 डॉक्टर भाजपमध्ये दाखल (500 doctors join bjp) झाल्याने पक्षाची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
मागील तीन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हार्दिक पटेल आणि इतर तरुण नेत्यांना सोबत घेत भाजपसमोर चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळे यंदा होणाऱया निवडणूक रिंगणात आणखी ताकदीने उतरण्याचा निर्धार भाजप नेतृत्वाने केला आहे. पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 4 मे पासून पुढील 6 महिने न थांबता काम करण्याच्या सूचना पक्षाने कार्यकर्त्यांना आधीच दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच रविवारी तब्बल 500 डॉक्टरांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.