वृत्तसंस्था/ मल्लपूरम (केरळ)
75 व्या राष्ट्रीय संतोष करंडक पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेत ब गटातील झालेल्या सामन्यात ओडिशाने गुजरातचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता.
शनिवारी झालेल्या या सामन्यात ओडिशाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर गुजरातवर दडपण राखले होते. चौथ्या मिनिटाला ओडिशाच्या फरिदचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने ओडिशाला खाते उघडता आले नाही. गुजरात संघातील आर. जेडजाला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले. 15 व्या मिनिटाला ओडिशाने खाते उघडण्याची संधी थोडक्यात घालविली. गुजरात संघाने पाठोपाठ चढाया करत ओडिशाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. ओडिशाचे खाते चंद्रा मुदुलीने खेळाच्या पूर्वार्धात उघडले. मध्यंतरापर्यंत ओडिशाने गुजरातवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. गुजरातने खेळाच्या उत्तरार्धात गोल नोंदवून ओडिशाशी बरोबरी साधली. 87 व्या मिनिटाला गुजरातचा हा गोल प्रवीण टिग्गाने नोंदविला. मुदुलीने ओडिशाचा दुसरा गोल केला. दरम्यान गुजरातने दुखापतीच्या कालावधीत पेनल्टी मिळविली आणि गुजरातने ओडिशाशी बरोबरी साधली. ओडिशाचा तिसरा आणि निर्णायक गोल रायसन तुडूने नेंदवित गुजरातचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले. या विजयामुळे ओडिशाचे ब गटातील आव्हान जिवंत असून हा संघ आता या गटातील दुसऱया स्थानासाठी लढत देईल.