Tarun Bharat

गुजरात जायंट्सच्या विजयाची हॅट्ट्रिक

Advertisements

अल्टिमेट खो खो लीगः चेन्नई क्विक गन्सचा पहिला विजय

वृत्तसंस्था /पुणे

म्हाळुंगेच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पहिल्या अल्टीमेट खो खो स्पर्धेमध्ये बुधवारी गुजरात जायंट्सने दुसऱयांदा मुंबई खिलाडीजचा पराभव करत या स्पर्धेतील विजयाची हॅट्ट्रिक साधली. दुसऱया सामन्यात चेन्नई क्विक गन्सने तेलुगू योद्धाजवर मात करीत पहिला विजय नोंदवला.

गुजरात जायंट्सचे नेतृत्व रंजन शेट्टीकडे सोपविण्यात आले होते. बुधवारच्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीजचा 18 गुणांनी पराभव केला. या स्पर्धेतील साखळी फेरीच्या सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीजवर 25 गुणांनी मात केली होती. गुजरात जायंट्सतर्फे रंजन शेट्टीने 6 गुण, विनायक पोकार्डे आणि निलेश पाटील यांनी अनुक्रमे 8 आणि 7 गुण मिळविले. या सामन्यात रंजन शेट्टी सर्वोत्तम चढाईपटू म्हणून निवडला गेला. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक मिळविणारा महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे या सामन्यावेळी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. साबळेच्या हस्ते रंजन शेट्टीला पुरस्कार देण्यात आला. मुंबई खिलाडीजतर्फे दुर्वेश साळुंखेने 11 गुण नोंदविले. त्याला या सामन्यात अल्टीमेट खो  पुरस्कार देण्यात आला. गुजरात जायंट्सच्या सुयश गरगट्टेला सर्वोत्तम बचावपटूचा पुरस्कार मिळाला.

या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रारंभी पॉवर प्लेच्या कालावधीत मुंबई खिलाडीजचे सर्व खेळाडू बाद केले. कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे, एस. विशाल यांना केवळ दोन मिनिटात गुजरात जायंट्सच्या खेळाडूंनी बाद केले. पहिल्या सात मिनिटांच्या कालावधीनंतर गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीजवर 25-0 अशी एकतर्फी आघाडी मिळविली होती. मुंबई खिलाडीजच्या दुर्वेश साळुंखेने गुजरात जायंट्सच्या चार खेळाडूंना बाद करत 11 गुण घेतले. पहिल्या डावाअखेर दोन्ही संघ 27-27 असे बरोबरीत होते. गुजरात जायंट्सच्या गरगट्टेने दोन बोनस गुण आपल्या संघाला मिळवून दिले.

गुजरात जायंट्सने आपल्या दुसऱया डावाला आक्रमक सुरुवात करताना 37 गुण मिळविले. गुजरात जायंट्सच्या निलेश पाटीलने मुंबई खिलाडीजचे तीन खेळाडू बाद केले. शेवटच्या सात मिनिटांच्या कालावधीत मुंबई खिलाडीजने दर्जेदार खेळ करत 21 गुण मिळविले. अखेर गुजरात जायंट्सने हा सामना 18 गुणांच्या फरकाने जिंकला. ही स्पर्धा 22 दिवस चालणार असून गुरुवार या स्पर्धेतील विश्रांतीचा दिवस आहे. शुक्रवारी राजस्थान वॉरियर्स आणि मुंबई खिलाडीज तसेच ओडिशा जगरनॉट आणि चेन्नई क्विक गन्स यांच्यात सामने होतील. या स्पर्धेतील अंतिम सामना 4 सप्टेंबरला खेळविला जाईल. प्रत्येक दिवशी दोन सामने खेळविण्यात येत आहेत. अन्य एका सामन्यात चेन्नई क्विक गन्सने पहिला विजय नोंदवताना तेलुगू योद्धाजचा पराभव केला. रामजी कश्यपच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर चेन्नईने योद्धाजवर सहा गुणांनी विजय मिळविला. तेलुगू योद्धाजचा हा पहिला पराभव आहे. तेलुगू योद्धाजसाठी अरुण गुणकीने आक्रमणात 13 गुण मिळविताना पाच खेळाडूंना बाद केले तर रोहन शिंगाडेने 11 गुण मिळविले.

Related Stories

गुजरातच्या विजयात तेवतियाचे सलग 2 षटकार!

Patil_p

अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा 19 नोव्हेंबरपासून

Patil_p

केर्बर, स्टीफेन्स पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

मिल्खा सिंग यांची प्रकृती खालावली

Patil_p

महाराष्ट्र खो-खो संघटनेची मुख्यमंत्री निधीला देणगी

Patil_p

रविचंद्रन अश्विन हा नेहमीच आक्रमक पर्याय

Patil_p
error: Content is protected !!