Tarun Bharat

गुजरात ः दुसऱया टप्प्यातही 60 टक्क्यांवर मतदान

पंतप्रधान मोदींनी साबरमतीमध्ये बजावला मताधिकार

गांधीनगर / वृत्तसंस्था

गुजरात विधानसभेसाठी सोमवारी दुसऱया टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालाची प्रतीक्षा आहे. राज्यात दुसऱया टप्प्यातही 60 टक्क्यांवर मतदान झाले आहे. आता गुरुवार, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत सर्व जागांचे निकाल अपेक्षित आहेत. गुजरातसोबतच 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही गुरुवारीच होणार आहे.

गुजरातमध्ये दुसऱया टप्प्यात 833 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. निवडणुकीच्या दुसऱया आणि अंतिम टप्प्यात राज्यातील 14 जिह्यांतील 93 जागांसाठी सोमवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 50.51 टक्के मतदान झाले होते तर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, साबरकांठा येथे सर्वाधिक 57.23 टक्के आणि अहमदाबादमध्ये सर्वात कमी 44.67 टक्के मतदान नोंदवले गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील राणीप भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानासाठी पंतप्रधान राणीपमध्ये पोहोचल्यावर ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. मतदानानंतर पंतप्रधानांनी बाहेर येऊन शाईची खूण दाखवली. गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कुटुंबासह अहमदाबादमधील नारनपुरा येथे सकाळी 10.45 च्या सुमारास मतदान केले. त्यानंतर त्यांनी एका मंदिरात जात देवदर्शन घेतले. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह वडोदरा येथे मतदान केले. मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मोदींच्या आई व्हीलचेअरवरून बूथवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा व्हीलचेअरवरून आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. निवडणूक आयोगाने 80 वर्षांवरील ज्ये÷ नागरिक आणि आजारी असलेल्यांनाही घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली आहे. असे असतानाही 100 वर्षीय हिराबा यांनी बूथवर पोहोचून मतदान करत आळसामुळे मतदानाला जात नसलेल्यांना एक वेगळा संदेश दिला.

‘आप’च्या विजयाचा गढवींचा दावा

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. यावेळी त्यांनी जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच राज्यात आम आदमी पक्ष मोठय़ा मताधिक्क्याने विजयी होईल असा दावा त्यांनी केला. पहिल्या टप्प्यात 89 पैकी 51 पेक्षा जास्त आणि दुसऱया टप्प्यात 93 पैकी 52 पेक्षा जास्त जागा ‘आप’ जिंकेल, असे ते म्हणाले.

Related Stories

गुणवत्तेची उपेक्षा होऊ नये

Patil_p

प्रचारसभा, रोड शो आता पूर्ण क्षमतेने

Patil_p

जेईई ॲडव्हान्स परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित

Tousif Mujawar

चोवीस तासांमध्ये 7 दहशतवादी ठार

Patil_p

असदुद्दीन ओवैसींच्या घराची तोडफोड; हिंदू सेनेचे 5 जण ताब्यात

datta jadhav

राहुल गांधींकडून देशाचा अपमान ः उपराष्ट्रपती

Patil_p