वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑस्ट्रियातील लिन्झ येथे झालेल्या विश्व युवा टेबल टेनिस कंटेन्डर स्पर्धेत भारताच्या हंसिनी मथन राजन हिने यू-13 गटातील सुवर्णासह दोन पदके पटकावली.
1 ते 3 मे या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यू-13 गटात हंसिनीने रोमानियाच्या अँड्रीया बायसूचा रोमांचक ठरलेल्या अंतिम सामन्यात 11-3, 7-11, 9-11, 11-0, 11-8 असा पराभव करून जेतेपद पटकावले. त्यानंतर तिने यू-15 वयोगटात कांस्यपदक मिळविले. या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तिने दक्षिण कोरियाच्या चोइ होसीयाला 3-0 असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली होती. पण उपांत्य फेरीत तिला दक्षिण कोरियाच्या यू येरिनकडून पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात कोरियाच्याच ली स्यूएंग्यूनने येरिनला हरवून जेतेपद पटकावले.