राष्ट्रीय स्पर्धेत राज्यातील पदकजेत्या ऍथलिट्सच्या बक्षीस रकमेत दुपटीने वाढ
अहमदाबाद / वृत्तसंस्था
‘36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणाऱया क्रीडापटू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफसाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भरघोस इनाम जाहीर केले. ‘गो फॉर गोल्ड’ मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व पदकजेत्यांची बक्षीस रक्कम आम्ही दुपटीने वाढवत आहोत’, असे ते याप्रसंगी म्हणाले. गुजरातचे क्रीडामंत्री हर्ष संघवी यांनी यावेळी गुजरातच्या खेळाडूंना यंदा होम ऍडव्हान्टेज असेल. त्याचा त्यांनी लाभ घेणे अपेक्षित असल्याचे नमूद केले. माजी ऑल इंग्लंड विजेता, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद व वर्ल्ड चॅम्पियन शूटर अंजली भागवत मुख्य निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
‘जर आपण 20 हजार ऍथलिट्सचा सहभाग असणारी एखादी स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करत असू तर केवळ 11 हजार ऍथलिट्सचा सहभाग असलेल्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात काहीच अडचण असणार नाही’, असे पुलेला गोपीचंद याप्रसंगी म्हणाले.
अंजली भागवत हिने देखील उपस्थितांना संबोधित केले आणि अहमदाबादमध्येच आपल्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती, त्या आठवणीला उजाळा दिला. ‘एनसीसी गर्ल या नात्याने मी अहमदाबादमध्ये पहिल्यावहिल्या स्पर्धेत सहभागी झाले. मेंटल स्ट्रेंथ, माईंडसेट यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. 100 टक्के प्रयत्नात कसूर असता कामा नये. पण, त्याचवेळी स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच आपण पोडियमवर आहोत, असे स्वतःच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. जर तुमचे मनच तिथे नसेल तर तुम्हीही तिथे असणार नाही’, असे अंजलीने नमूद केले.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी यावेळी राष्ट्रीय स्पर्धेकरिता किटचे अनावरण केले. शिवाय, स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. खेळाडू, प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक, संघव्यवस्थापक, वरिष्ठ पदाधिकारी, राज्यस्तरीय पदाधिकारी, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी असे साधारणपणे 2 हजार लोक याप्रसंगी उपस्थित होते. यंदाची राष्ट्रीय स्पर्धा अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, बडोदा, राजकोट व भावनगर येथे दि. 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.