वृत्तसंस्था/ मेनोर्का (स्पेन)
भारतीय ग्रॅण्डमास्टर डी.गुकेशने रविवारी येथे मेनोर्का खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. गेल्या दोन आठवडय़ाच्या कालावधीतील गुकेशने दोन स्पर्धा जिंकल्या आहेत.
मेनोर्का बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटूंनी आपले वर्चस्व शेवटपर्यंत राखताना आघाडीच्या 10 बुद्धिबळपटूंमध्ये सात भारतीय बुद्धिबळपटूंचा समावेश राहिला. भारताचा 15 वर्षीय ग्रॅण्डमास्टर गुकेशने सातव्या फेरीअखेर सहा गुणांसह अजिंक्यपद पटकाविताना 1600 युरोजचे रोख बक्षीस जिंकले. सातव्या आणि शेवटच्या फेरीतील लढतीत गुकेशने आपल्याच देशाच्या बी.अधीबनचा पराभव केला. गुकेशने या स्पर्धेत 134 यलो गुण घेत विश्व मानांकन यादीत पहिल्या 80 बुद्धिबळपटूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर आर्यन चोप्राने उपविजेतेपद मिळविताना 5.5 गुण घेतले. अर्मेनियाच्या सर्जीसनने तिसरे स्थान तसेच अर्मेनियाच्या एम. हैकने चौथे स्थान पटकाविले. भारतीय ग्रॅण्डमास्टर सेतुरामन पाचव्या स्थानावर राहिला. गुकेशने या स्पर्धेत पाच विजय नोंदविले असून दोन डाव बरोबरीत राखले. चेन्नईच्या गुकेशने गेल्या रविवारी स्पेनमध्ये झालेली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती.