वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात गुमानसिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यु मुम्बा संघाने पाटणा पायरेट्सचा 36-23 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात गुमानसिंगने 13 गुण तर आशिषने 6 गुण नोंदविले.
हरेंद्र कुमार आणि किरण मगर यांनी आपल्या चढायांवर यु मुम्बाला सामन्यातील सहाव्या मिनिटाला 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. पाटणा पायरेट्सच्या रोहित गुलियाने हरेंद्र कुमारला बाद केले. त्यानंतर सुनील आणि आशिष यांनी पाटणा पायरेट्सला काही गुण मिळवून दिल्याने हा सामना 5-5 असा बरोबरीत राहिला. 13 व्या मिनिटाला यु मुम्बाच्या मोहितने आपल्या संघाला आणखी 3 गुण मिळवून दिले. 17 व्या मिनिटाला गुमानसिंगने आपल्या चढाईवर 2 गुण मिळविल्याने यु मुम्बाची आघाडी 13-8 अशी राहिली. मध्यंतराला केवळ दोन मिनिटे बाकी असताना पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद झाल्याने यु मुम्बाने 18-13 अशी बढत पाटणा पायरेट्सवर घेतली होती. पाटणा पायरेट्स संघातील सचिनला यु मुम्बाची बचावफळी भेदण्यात अपयश आले. 24 व्या मिनिटाला यु मुम्बाची स्थिती 21-13 अशी भक्कम होती. 33 व्या मिनिटाला गुमानसिंगने आपल्या चढाईवर पाटणा पायरेट्सचे काही गडी बाद केल्याने त्यांचे मैदानावर केवळ तीन गडीच शिल्लक राहिले होते. यु मुम्बाने त्यानंतर पुढील मिनिटाला पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद करून 32-20 अशी भक्कम आघाडी घेतली. अखेर यु मुम्बाने हा सामना 36-23 अशा 13 गुणांच्या फरकाने आरामात जिंकला.