ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजघराण्यातील सदस्यांबद्दल अफजल्याची औलाद आणि राजघराण्याला मानत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदवर्ते यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी अर्थररोड जेलमधून ताब्यात घेतले होते. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच सदावर्ते यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. यामध्ये मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा अवमान केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दिलीप पाटील यांनी याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत शाहूपुरी पोलीस ठाण्यात सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.