ऑनलाईन टीम / सातारा :
राजघराण्यातील सदस्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावली आहे.
मराठा आरक्षणाला विरोध, शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील हल्ला अशा कारणांनी कायम वादग्रस्त भूमिकेत राहिलेले सदावर्ते आर्थर रोड जेलमध्ये होते. त्यांनी सातारा-कोल्हापूर राजघराण्याबद्दल बोलताना या अफजल्याच्या औलादी आणि असल्या घराण्याला मी मानत नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी 9 ऑक्टोबर 2020 ला सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षात त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. सिल्वर ओकवरील हल्ल्यानंतर त्यांची जणू शंभरी भरली. गुरुवारी (दि.14) सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. गुरुवारी त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे सदावर्ते यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, मुंबई, सातारा व्यतिरिक्त सदावर्ते यांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.