सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
कलारंग प्रतिष्ठानतर्फे रविवार 16 रोजी पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात गुणीरंग संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कला व संस्कृती संचालनालय, इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त सहकार्याने होणाऱया या एकदिवशीय महोत्सवात नामवंत कलाकारांच्या गायन वादनाच्या मैफली होणार आहेत. या कलाकारांचा परिचय पुढील प्रमाणे.
कार्यक्रमाचे उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते होणार असून यावेळी पद्मश्री प्रसाद सावकार, मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पं. गिरीश संझगिरी
संझगिरी हे पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य असून त्यांनी देशविदेशात घरंदाजी गायकीचा श्रोत्यांना आनंद दिला आहे. शास्त्रशुद्ध गायकीसाठी ते ओळखले जातात. महोत्सवाच्या दुसऱया सत्रात त्यांचे गायन होणार आहे.
पं. कमलाकर नाईक
आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक पं. कमलाकर नाईक यांनी पं. रत्नकांत रामनाथकर, पं. वि. रा. आठवले, पं. बबनराव हळदणकर, अभिषेकी बुवा, उस्ताद अस्लम खान या नामवंत गुरुकडून गायनाची तालीम घेतली आहे. पुणे येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते गायिले आहेत. त्यांनी अनेक शिष्य घडविले आहे.
रुपेश गांवस
रुपेश गांवस यांनी गोवा संगीत महाविद्यालयात गायन विषयात पदवी प्राप्त केली असून त्यांना पं. सुधाकर करंदीकर, डॉ. हनुमंत बुरली व पं. कमलाकार नाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या पं. विजय बक्षी यांच्याकडे ते पुढील शिक्षण घेत आहेत. पं. बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापिठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिसमिल्ला खाँ युवा पुरस्कार त्यांना लाभला आहे.
अमित भोसले
अमित भोसले हे कला अकादमीच्या केपे संगीत केंद्रात तबला शिक्षक आहेत. संगीत महाविद्यालयात त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पं. तुळशीदास नावेलकर, मारुती कुर्डीकर, उल्हास वेलिंगकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले असून शिवाजी विद्यापिठात पदव्युत्तर पदवीसाठी अमोल दंडगे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. अनेक संमेलनामध्ये त्यांनी तबला एकलवादन सादर केले आहे.
अमला कारापूरकर
अमला कारापूरकर यांनी शास्त्राrय गायनाचे शिक्षण आग्रा घराण्याच्या रंजना कश्यप यांच्याकडून घेतले. गेली बरीच वर्षे पं. कमलाकार नाईक यांच्याकडे त्या शिकत आहेत. संगीत विशारद व शिवाजी विद्यापीठातून एम. ए. पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
महेश साखळकर
महेश साखळकर हे निवृत्त संगीत शिक्षक असून प्रारंभीचे शिक्षण त्यांनी कमलाकांत वळवईकर व त्यानंतर निर्मला पै काकोडे यांच्याकडून घेतले. पं. कमलाकर नाईक यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. पं. सोमनाथबुवा च्यारी यांच्याकडून त्यांनी भजन गायिकीचे मार्गदर्शन घेतले आहे.
श्रृती चेतन बोरकर
श्रृती बोरकर यांनी गौरीश तळवलकर व प्रदीप नाईक यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे तर प्रदीप शिलकर यांच्याकडून नाटय़संगीताचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांनी संगीत नाटकातूनही भुमिका वटविल्या आहेत.
कलाकारांना संवादिनीवर प्रसाद गांवस व दत्तराज म्हाळशी तर तबल्यावर मिलिंद परब, अमर मोपकर, नितीन कोरगावकर व डॉ. उदय कुलकर्णी हे साथसंगत करतील.