वृत्तसंस्था/ गयाना
कॅरेबियन प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेत झालेल्या सामन्यात गयाना अमेझॉन वॉरियर्सने बार्बाडोस रॉयल्सचा आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाच गडय़ांनी पराभव केला.
या विजयामुळे गयाना अमेझॉनने 11 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. बार्बाडोस रॉयल्स संघ 16 गुणासह पहिल्या स्थानावर असून सेंट लुसिया किंग्जने 9 गुणासह तिसरे तर जमैका तलैवाजने 9 गुणासह संयुक्त तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत प्राथमिक लिग टप्प्यात प्रत्येक संघाने आपले 10 सामने पूर्ण केले आहेत. पुढील फेरीत स्थान मिळविण्यासाठी बार्बाडोस रॉयल आणि गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यात पहिला क्वॉलिफायर सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश करेल. तसेच जमैका तलैवाज आणि सेंट लुसिया यांच्यात एलिमिनेटर सामना होईल.
या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोस रॉयल्सचा डाव 17.3 षटकात 125 धावात आटोपला. बार्बाडोस संघातर्फे जेसन होल्डरने 42, आझम खानने 20 धावा जमविल्या. गयाना अमेझॉनतर्फे शेफर्डने 3 तर किमो पॉल आणि ओडेन स्मिथ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यानंतर गयाना अमेझॉन वॉरियर्सने 14.3 षटकात 5 बाद 126 धावा जमवित हा सामना 5 गडय़ांनी जिंकला. सामनावीर शकीब अल हसनने 53 तर गुरबाजने 22 धावा जमविल्या. मॅकॉयने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः बार्बाडोस रॉयल 17.3 षटकात सर्व बाद 125, गयाना अमेझॉन वॉरियर्स 14.3 षटकात 5 बाद 126.