ऑनलाईन टीम / लखनऊ :
वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, उद्या या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान, सर्वेक्षण करताना मशिदीतील विहिरीत 12 फूट 8 इंच व्यासाचं शिवलिंग (Shivling) सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला असून, त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर न्यायालयानेही ज्या जागेवर शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या जागेला तातडीनं सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सुरक्षेची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफला दिली आहे.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी पाहणीदरम्यान मशिदीतील वाजुखानाच्या अगदी मध्यभागी शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. तर मुस्लिम पक्षाने हा दावा फेटाळला आहे. संबंधित भाग कारंजाचा असल्याचे मुस्लिम पक्षाने म्हटले आहे. मशिदीच्या वाजुखान्यात पाणी भरले आहे. कोणीही वाजुखान्याशी छेडछाड करू नये, म्हणून न्यायालयाने हा भाग तातडीने सील करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शिवलिंगाच्या संरक्षणासाठी आता पुन्हा सिव्हिल न्यायालयात अर्ज केला जाणार आहे.
हिंदू पक्षाचे याचिकाकर्ते सोहनलाल आर्य यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शिवलिंग….नंदी ज्याची प्रतिक्षा करत होता, त्या गोष्टी स्पष्ट झाल्या. त्याचक्षणी मशिदीच्या आवारात ‘हर हर महावदेव’चा जयघोष घुमला. आता पश्चिमेकडच्या दरवाजाजवळ असलेल्या अवशेषांची तपासणी करण्याचीही आम्ही मागणी करणार आहोत.” हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार 12 फूट 8 इंच व्यासाचं शिवलिंग सापडलं आहे. या शिवलिंगाचं तोंड नंदीकडे असून, वाजुखान्यातील सर्व पाणी काढून केलेल्या पाहणीवेळी ते आढळल्याचा त्यांचा दावा आहे.