विश्रुत चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित विश्रुत चीट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत विश्रुत चषक बारा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनादिवशी युनियन जिमखाना संघाने अर्जंट स्पोर्ट्स संघाचा 189 धावानी, आनंद अकादमीने एडीफाय संघाचा 90 धावानी, बेळगाव स्पोर्ट्स क्लबने एसकेईचा 32 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. नीना स्पोर्ट्स व सीसीआय संघातील सामना टाय झाला. अर्जुन येळ्ळूरकर, श्लोक चडीचाळ, आरूष पुत्रन, समर्थ चौगुले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे चंदन कुंदरनाड व नितीन चिकोर्डे यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देवेंद्र कुडची, प्रमोद पालेकर, मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाच्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने अर्जंट स्पोर्ट्स संघाचा 189 धावांनी पराभव केला. युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 1 बाद 270 धवांचा डोंगर उभा केला सलामीवीर अर्जुन येळ्ळूरकरने 12 चौकार व 1 षटकारासह नाबाद 84 ध्प्तवा काढल्या. कर्णधार मोहम्मद हमजाने 11 चौकारासह नाबाद 58 धावा केल्या तर अतिथी भोगनने नाबाद 34 धावा केल्या. उत्तरादाखल अर्जंट स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 9 बाद 81 धावा केल्या. अर्जुन प्रधानने 27 तर निखिल राठोडने 11 धावा केल्या. जिमखानातर्फे अद्वैत पाटीलने 2 तर प्रीतम माळगे, अब्बास किल्लेदार, सलमान धारवाडकर, शाहरुख धारवाडकर, आदित्य हुंबरवाडी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात आनंद अकादमी संघाने 25 षटकात 6 बाद 150 धावा केल्या. अमर पटवेगारने 26, अथर्व करडेने 15 धावा केल्या. एडीफायतर्फे धनराज पिल्ले, राज थोरात, अंशुमन विराज पाटील, प्रीतम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल एडिफाय संघाचा डाव 61 धावात आटोपला. अंशुमन राजपुरोहित 18, सिराज कात्राळने 15 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे श्लोक चडीचाळ, अथर्व करडी, समर्थ खर्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 25 षटकात 4 बाद 144 धावा केल्या. कर्णधार आरुष पुत्रनने 7 चौकार 1 षटकारासह 67 धावा केल्या. लक्ष के.ने 22, इम्तियाज मंडळने 19 धावा केल्या. उत्तरादाखल एसकेई संघाने 25 षटकात 6 बाद 112 धावा केल्या. समर्थ कोकणेने 24, वेदांत पाटीलने 20 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टसतर्फे अवनीशने दोन गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात सीसीआय संघाने 25 षटकात 7 बाद 122 धावा केल्या. स्वयम खोतने 35, खंडू पाटीलने 30 धावा केल्या. नीनातर्फे समर्थ चौगुलेने 3, फराज काजीने 2 गडी बाद केले. उत्तरादाखल नीना स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 8 बाद 122 धावाच केल्या. त्यामुळे सामना टाय झाला. समर्थ चौगुलेने 5 चौकार 2 षटकारासह 60, कृष्णाने 17 धावा केल्या. सीसीआयतर्फे वरद पाटील, कलश बेनकट्टी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.