आज कॅमेऱयांनी सुसज्ज आणि इंटरनेटशी कनेक्ट करण्यात सक्षम असलेले स्मार्ट टीव्ही भारतीय घरांमध्ये झपाटय़ाने लोकप्रिय होत आहेत. तसेच तो घरामध्ये असणे हे प्रति÷sचे लक्षणही मानले जात आहे. मात्र ह्या इंटरनेटच्या जमान्यात हा स्मार्ट टीव्ही हॅकिंगसाठी लक्ष्य बनवला जात असल्याचे दिसून येते आहे.
मध्यंतरी एका भोपाळमधील जोडप्याच्याबाबतीत घडलेल्या घटनेने ‘असे ही घडू शकते’ हे लक्षात आले व डोळे खाडकन उघडले. झाले असे की राजेशकुमार व त्याच्या पत्नीचा एक ‘इंटिमेट व्हिडिओ’ स्मार्ट टीव्ही हॅक करून इंटरनेटवर अपलोड करण्यात आला. (स्थळ व नाव बदलले आहे) या घटनेचे पडसाद राज्यसभेमध्येही उमटले. याबाबत बोलताना खा. अमर साबळे म्हणाले की ‘जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटविश्वात दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. मात्र तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये घुसून आपल्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. ही अतिशय चुकीची आणि धक्कादायक बाब आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमर साबळे यांनी केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही ही बाब गंभीरपणे घेण्याची गरज आहे, असे मत नोंदवले आहे.
राजेश कुमार यांना बेडरूममधील त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर पॉर्न पाहण्याची सवय होती आणि तो अनेकदा प्रौढांच्या वेबसाइट्स उघडत असे. असेच एक वेबसाईट बघत असता त्याला धक्का बसला. कारण एका पॉर्न साइटवर त्याचा आणि त्याच्या पत्नीचा व्हिडिओ सापडला. तो आश्चर्यचकित झाला आणि अत्यंत अस्वस्थही. भोपाळमधील एका पॉश वस्तीमध्ये राहणाऱया राजेश कुमारने सार्वजनिक अपमानाच्या व बदनामीच्या भीतीने पोलिसांशी संपर्क साधला नाही. मात्र त्याच्या मित्राच्या संपर्कातून एक संगणक इंजिनिअर व सायबर सिक्मयुरीटीमध्ये काम करण्याऱया तज्ञांशी बोलून याचा शोध घेतला. त्यांनी बराच शोध घेतला पण कुठेही छुपा कॅमेरा आढळला नाही. हे कसे शुट केले असेल हे उलगडले नाही. मात्र लक्षात आले की खोलीमध्ये फक्त स्मार्ट टीव्हीचा कॅमेरा आहे. मग टीव्ही व त्याचे सॉफ्टवेअर तपासले असता लक्षात आले की स्मार्ट टीव्हीचा कॅमेरा रिमोटली (दुसऱया ठिकाणाहून) ऑपरेट करुन हे रेकॉर्ड केले आहे. ह्यानंतर मात्र राजेशकुमार यांनी पोलीसात तक्रार दिली. पोलीसांच्या तपासात असे दिसून आले की राजेश पॉर्न वेबसाइट्सला भेट देत असे, अशाच एका साइटवरील हॅकरने सहजपणे टीव्हीमध्ये घूसून- जसे संगणक हॅक केले जातात तसे आणि सरळ फीड कॅप्चर करण्यासाठी इन-बिल्ट कॅमेरा रिमोट पध्दतीने वापरला. टीव्हीला वायफाय कनेक्ट असल्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ देखील ऑनलाइन अपलोड केला गेला. आणि हे सर्व दोघांच्या नकळत.
आज नवीन-युगातील तंत्रज्ञान खाजगी गोष्टींमध्ये किती आक्रमण करू शकते ते या घटनेने उघड केले आहे. त्यामुळे याबाबतीत आपण दक्ष राहणेच इष्ट असणार आहे. अनेक उत्पादक त्यांचे टीव्ही सेट अनेक सुरक्षा वैशिष्टय़ांसह सुसज्ज करतात परंतु ते ऑनलाइन सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाहीत.
आज जगातले हॅकर्स कंपनीच्या किंवा सरकारी वेबसाइट्स, बँका आणि इतर संवेदनशील ठिकाणच्या उच्च श्रेणीतील सुरक्षा प्रणाली हॅक करू शकतात, तर कॅमेरा आणि इंटरनेट कनेक्टीव्हिटी असलेले टीव्ही हॅक करणे किती सोपे असेल.
आपल्याकडे असलेल्या स्मार्ट टीव्हीचा मुख्य फायदा म्हणजे, कोणताही अँटेना न जोडता शिवाय, केवळ इंटरनेटद्वारे टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट आणि संगीत या सेवा देऊ करणाऱया वाहिन्यांमध्ये प्रवेश करता येतो. तसेच, काही स्मार्ट टीव्हींना वेब ब्राउझिंग, गेमिंग आणि संगणक कनेक्टीव्हिटी ही सुविधा मिळते. स्मार्ट टीव्हींना इंटरनेट जोडता येत असल्याने तो प्रभावीपणे वापरता येण्यासाठी पर्याय दिले आहेत. उदा. सर्च करण्यासाठी आणि कमांड देण्यासाठी व्हॉईस कमांडची सोय आहे. तसेच या शिवाय व्हिडिओ चॅट आणि गेम्ससाठी कॅमेरेही आहेत. हे पर्याय टीव्ही वापरण्यासाठी सोपे, मजेदार वाटतात. परंतु त्याचप्रमाणे हे पर्याय असुरक्षिततेची दारेही उघडतात.
ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम ही स्मार्ट टीव्हींमध्ये वापरली जाते. स्मार्ट टीव्ही इंटरनेटला जोडलेला असल्याने हॅकर ह्या स्मार्ट टीव्हीच्या ऑपरेटिंग सिस्टीममधील दोष शोधून त्याचा ताबा मिळवतात व त्याचा दुरुपयोग करतात. स्मार्ट टीव्हीचा ताबा चुकीच्या व्यक्तीच्या / हॅकरच्या हातात गेल्यामुळे, आपल्या स्मार्ट टीव्हीचा कंट्रोल घेऊन त्याचा मायक्रोफोन आणि वेब कॅमेरा सुरू करुन पाळत ठेवता येऊ शकते.
मध्यंतरी विकिलिक्सने जे हजारो दस्तऐवज प्रसिध्द केले त्यामध्ये CIA कसे फोन, संगणक आणि इतर गॅझेटवर हेरगिरी करण्यास सक्षम आहे हे सांगितले त्याचा संदर्भ घेऊन CIA आणि UK च्या MI5 सुरक्षा एजन्सीने मिळून विकसित केलेले एक कथित हेरगिरी साधन ‘वीपिंग एंजल’, जे स्मार्ट टीव्ही हॅक करु शकते. ह्यामध्ये टीव्ही बंद असल्याचे भासवून, टीव्ही स्क्रिन बंद असताना तुमचे संभाषण रेकॉर्ड केले जाऊ शकते.
स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांसाठी सायबर गुन्ह्य़ाची जोखीम दोन प्रकारांमुळे उद्भवू शकते. गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची समस्या ह्या दोन जोखीमा आज स्मार्ट टीव्ही युझरच्या समोर आहेत. गोपनीयतेमध्ये आपल्या सवयींचे परीक्षण केले जाणे आणि आपला वैयक्तिक डेटा चोरणे आणि विकणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो तर सुरक्षिततेच्या बाबतीत व्हायरस, ट्रोजन, मालवेअर आणि हॅकर्स ही समस्या असते.
मग स्मार्ट टीव्ही वापरायचा नाही का? आणि वापरायचा असेल तर काय काळजी घ्यावी. इंटरनेट राउटरला डीफॉल्ट नाव बदलून आपण दुसरे नाव द्यावे तसेच त्याचा पासवर्ड बदलावा. स्ट्राँग पासवर्ड असावा. अर्थात पासवर्डमध्ये अक्षर, संख्या, चिन्ह याचा समावेश करणे विसरू नये. राऊटर सेटिंग्स तपासावीत. आपल्याला येत नसेल तर तज्ञ माणसाकडून योग्य ती सेटिंग्स करुन घ्यावीत आणि सगळय़ात महत्वाचे म्हणजे ते समजून घ्यावे. स्मार्ट टीव्हीचा कॅमेरा बंद ठेवावा. इनबिल्ट कॅमेरा असल्यास त्यावर काळी चिकटपट्टी लावावी. कंपनीने दिलेली फर्मवेअर व अपडेट्स वेळोवेळी इन्स्टॉल करावी.
आपल्या कडील टीव्ही योग्य त्या पध्दतीने हाताळा, सेटिंग्स योग्य ती ठेवा. आपल्या स्मार्ट टीव्हीला घरचा भेदी बनवू नका.
– विनायक राजाध्यक्ष