वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग (जर्मनी)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या हॅम्बुर्ग महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून रोमानियाची 30 वर्षीय महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपने प्रकृती नादुरूस्तीमुळे माघार घेतली आहे. या स्पर्धेत हॅलेपने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता.
येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेपूर्वी तंदुरूस्तीची समस्या निर्माण होवू नये याकरिता हॅलेपने हॅम्बुर्ग टेनिस स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. या स्पर्धेत खेळताना तिला मानेची दुखापत झाली होती. आता हॅलेपने या स्पर्धेतून माघार घेतल्याने कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्क्यूला अंतिम फेरीसाठी पुढे चाल मिळाली आहे. हॅलेपने 2019 साली विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. आता 2022 विम्बल्डन स्पर्धेत तिचा सलामीचा सामना झेकच्या मुचोव्हाशी होणार आहे.