आंबट-गोड आठवणींनी भरलेली सीरिज
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आता ‘हाफ पँट्स फुल पँट्स’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये मुलांच्या मस्तीसोबत एक विशेष सामाजिक संदेश देण्यात आल्याचे दिसून येते. अभ्यासात काहीसा मागे पडलेला एक मुलगा दररोज नवी स्वप्ने पाहत असल्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येते.
या वेबसीरिजची कहाणी दक्षिण भारतातील एका शहरावर आधारित आहे, येथील छोटा मुलगा आनंद उर्फ डब्बा त्याचे कुटुंब तसेच त्याचा मित्रपरिवार यावर याची कथा गुंफण्यात आली आहे. सीरिजची कहाणी आनंद सस्पी यांच्या ‘हाफ पँट्स फुल पँट्स’ नावाच्या पुस्तकावरून घेण्यात आली आहे. लोकांना विशेष संदेश देणाऱया या सीरिजमध्ये अश्वनाथ अशोककुमार, आशीष विद्यार्थी, सोनाली कुलकणी तसेच कार्तिक विजान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
सध्याच्या घाईगडबडीच्या काळात हाफ पँट्स फुल पँट्सची कहाणी अत्यंत वेगळी आणि मनाला भावणारी आहे. जीवन जेव्हा साधे आणि सरळ होते, अशा काळात ही कहाणी प्रेक्षकांना नेणार आहे. या सीरिजमध्ये काम केल्यावर चांगला अनुभव मिळाला. ही सीरिज पाहणाऱया प्रत्येकाला त्याचे बालपण आणि शालेय जीवन आठवणार असल्याचे उद्गार आशीष विद्यार्थी यांनी काढले आहेत.
या सीरिजची कहाणी पूर्वीच्या धकाधकीच्या नसलेल्या काळाबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी देते. या सीरिजने मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून दिली. तेव्हा इंटरनेट नव्हता तसेच फोन देखली नव्हता. जगभरातील प्रेक्षकांना ही हलकी-फुलकी ड्रामा सीरिज अत्यंत आवडेल अशी अपेक्षा असल्याचे सोनाली कुलकर्णीने म्हटले आहे. व्ही.के. प्रकाश यांच्याकडून दिग्दर्शित ही सीरिज 16 डिसेंबर रोजी भारतासह जगभरात प्रदर्शित होणार आहे.