Tarun Bharat

हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू

शेतकऱयांची जिल्हाधिकाऱयांकडे धाव

प्रतिनिधी/ बेळगाव

हलगा-मच्छे बायपासचे काम दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी पुन्हा काम सुरू केल्यामुळे शेतकऱयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयात खटला दाखल असताना बेकायदेशीररित्या काम केले जात आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत. मात्र पोलीस फौजफाटा घेऊन दडपशाही करत हे काम सुरूच ठेवले असल्यामुळे शेतकऱयांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शनिवारी काम सुरू केल्यानंतर शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली. मात्र जिल्हाधिकाऱयांनी आम्हाला सहकार्य करा, असे सांगून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाची स्थगिती असताना मच्छे गावाकडून मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी काम सुरू केले. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध केला. यावेळी शेतकऱयांना धरपकड करून पोलीस स्थानकात डांबले गेले होते. त्यानंतर दुसऱया दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारपर्यंत काम करून बंद करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेळगावात येणार होते. त्यामुळेच हे काम बंद ठेवण्यात आले होते, हे आता स्पष्ट झाले आहे.

प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांच्यासह पोलीस आणि कंत्राटदार शनिवारी सकाळी दाखल झाले. शेतकरीही घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी शेतकऱयांना त्या परिसरात येण्यास मज्जाव केला. त्यामुळे केवळ विरोध करण्याव्यतिरिक्त शेतकऱयांकडे काहीच नव्हते. जिल्हा प्रशासनाच्या नावाने आणि सरकारच्या नावाने शिमगा करत शेतकरी त्याठिकाणी ठाण मांडून होते. न्यायालयाचा अवमान झाला असून आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीही अनेकवेळा दडपशाही करत रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शेतकऱयांनी विरोध केला. मात्र आता पोलीस फौजफाटा घेऊन कामाला सुरुवात केली आहे.

न्यायालयाने स्थगिती दिली असताना अशाप्रकारे बेकायदेशीररित्या दडपशाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.   मच्छे येथील उभ्या ऊस पिकांतून जेसीबी दोनवेळा फिरविण्यात आला आहे. ऊस तोडणीसाठी आला असताना पिकामध्ये जेसीबी घातल्यामुळे मागीलवेळी मच्छे येथील अनगोळकर या शेतकऱयाच्या एका मुलाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले होते तर एका मुलाने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. या घटनेमुळे त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.

हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये तिबारपिकी जमीन जात आहे. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. मच्छे, वडगाव, शहापूर, मजगाव, जुने बेळगाव या परिसरातील शेतकरी ऊस, भाजीपाला आदी पिके घेत आहेत. ही पिके घेण्यासाठी विहीर, कूपनलिका खोदाई केली आहे. संपूर्ण शेतामध्ये पाईप घातल्या आहेत. त्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांचे कुटुंब हळहळत आहे. लहान मुलांसह महिलावर्ग देखील शेतातून जाणारा रस्ता पाहून अश्रू ढाळत आहेत. काही शेतकऱयांची संपूर्ण जमीन जात असल्यामुळे भूमीहीन होणार आहेत. 

शेतकऱयाने मांडली कैफीयत

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची शेतकऱयांनी भेट घेतली. यावेळी प्रकाश नाईक या शेतकऱयाने कैफीयत मांडली. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हा रस्ता बंद केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. याबाबत अधिकाऱयांना सूचनादेखील केल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना हा रस्ता केला जात आहे. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, मुख्यमंत्र्यांनीही अधिकाऱयांना सूचना केली आहे. असे असताना हा रस्ता केला जात आहे. हे योग्य नाही, याचा विचार करा आणि रस्त्याचे काम थांबवा, असे त्यांनी सांगितले.

मात्र जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हा रस्ता मंजूर झाला आहे. त्याबदल्यात आम्ही तुम्हाला रक्कम देत आहोत. हवी तर त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करू. मात्र तुम्ही सहकार्य करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी राजू मरवे, रमाकांत बाळेकुंद्री यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

मजगाव ग्रामस्थ डेंग्यू निर्मूलनासाठी आज जिल्हाधिकाऱयांना देणार निवेदन

Patil_p

स्व-साहाय्य संघांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण शक्य

Amit Kulkarni

पथदीपांचा निधी गेला कुठे?

Amit Kulkarni

तुरमुरी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत एमडी स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

कणकुंबी-पारवाड ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

Amit Kulkarni

नूतन न्यायाधीशांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!