येळ्ळूर रस्त्यापर्यंत केले सपाटीकरण : पोलीस फौजफाटाही तैनात : विरोध झुगारून काम सुरू ठेवल्याने शेतकऱयांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच असून आता येळ्ळूर रस्त्यापर्यंत या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सपाटीकरण करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. शेतकऱयांनी विरोध केला असतानाही काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायालयाची स्थगिती असताना पुन्हा मच्छे गावाकडून हा रस्ता करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. उभ्या ऊस पिकांतून जेसीबी फिरविण्यास सुरुवात केली. याचबरोबर आता येळ्ळूर रस्त्यापर्यंत सपाटीकरण करण्यात आले आहे. शेतकऱयांनी विरोध केला असता त्यांना अटक करण्यात आली होती. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून या रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. हा रस्ता सुरू करताना शेतकऱयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि अधिकाऱयांना न्यायालयामध्ये असलेल्या खटल्याची माहिती दिली. मात्र त्यावेळी प्रांताधिकारी रविंद करलिंगण्णावर व इतर अधिकाऱयांनी काही बनावट कागदपत्रे शेतकऱयांना दाखविली असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे.
शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा प्रकार
न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्याबाबत आदेश दिले आहेत. याचबरोबर खटलाही दाखल झाला आहे. त्या खटल्यावर न्यायालयात सुनावणीच झाली नाही तर निकाल कोठून लागला, असे सांगून शेतकऱयांनी अधिकारी व कंत्राटदाराला धारेवर धरले होते. तरीदेखील या रस्त्याचे काम सुरूच ठेवले. त्याला शेतकऱयांनी विरोध केला असता त्यांना ताब्यात घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर हे काम सुरूच ठेवले असून आता येळ्ळूरच्या रस्त्यापर्यंत सपाटीकरण केले आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. एकूणच शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
तीव्र संताप व्यक्त
कंत्राटदाराने जेसीबीसह इतर सामग्री घेऊन पुन्हा या रस्त्याचे काम सुरू ठेवले आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असताना अशाप्रकारे बेकायदेशीररित्या दडपशाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक वर्षांपूर्वीदेखील अशाप्रकारे शेतकऱयांवर दडपशाही करत रस्ता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.