सहकार, राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय : राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात
वार्ताहर /निपाणी
निपाणी तालुक्यातील सहकाराचा केंद्रबिंदू असणाऱया आणि राजकीय स्थिती भक्कम करण्यासाठी पूरक असणारा कारखाना म्हणून हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. गेल्या चार वर्षात कारखान्याने प्रगतीची दिशा धरली आहे. पुढीलवर्षी सप्टेंबर महिन्यात या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. अशा या स्थितीत कारखान्याचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याविषयी राजीनाम्याचे कारण मात्र गुलदस्त्यात ठेवले असून हा विषय सहकार व राजकीय क्षेत्रात चर्चेचा बनला आहे.
याविषयी बोलताना चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, मी गेल्या 18 वर्षांपासून हालशुगरमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे. यातील गेली चार वर्षे चेअरमन पदावर कार्यरत होतो. कामाच्या वाढत्या व्यापामुळे मी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. असे असले तरी संचालक म्हणून मी कार्यरत आहे, असे सांगितले. कारखान्यावर हालसिद्धनाथांची कृपादृष्टी कायम आहे आणि राहणार आहे. गट-तट, मतभेद असे कोणतेही कारण नसून मी याविषयी काहीही बोलणार नाही. कोणाचेही नाव बिघडविणार नाही आणि मला काहीही त्यातून साध्य करायचे नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान गत पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी कारखाना आर्थिक अडचणीत आला होता. कारखान्याला टाळे लागणार काय?, अशी परिस्थिती होती. अशावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांनी बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले. याचवेळी चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह अविनाश पाटील, पप्पू पाटील, विश्वनाथ कमते, आप्पासाहेब जोल्ले, रामगोंडा पाटील, समित सासणे, तत्कालीन सत्ताधारी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या गटातून जोल्ले यांच्यासोबत आले. यानंतर झालेल्या निवडणुकीत विजयीही झाले व कारखान्यावर जोल्ले पुरस्कृत आघाडीची सत्ता आली. यावेळेपासून चंद्रकांत कोठीवाले चेअरमन पदावर आले.
कारखान्याची निवडणूक, सत्ताकारण यावेळेपासून कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले नेहमीच जोल्ले दाम्पत्याच्या पाठीशी राहिले. कारखान्याला आणलेली उर्जितावस्था, विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प मंजुरी या प्रक्रियेतून भारावून गेलेल्या चंद्रकांत कोठीवाले यांनी अनेकवेळा समारंभाच्या निमित्ताने खासदार आण्णासाहेब जोल्ले यांचे लाभलेले नेतृत्त्व म्हणजे कारखान्याचे ते प्रती संस्थापकच आहेत, असेही सांगितले होते. असे असताना कोणतीही वाच्यता न करता दिलेला राजीनामा अनेकांना अचंबित करत आहे.