कॉन्टॅक्टलेस मायक्रोचिप इम्प्लांट तंत्रज्ञान विकसित
ब्रिटन आणि पोलंडची कपंनी वॉलेटमॉरने केलेला दावा अत्यंत रोमांचक आहे. इम्प्लांटेबल पेमेंट चिप्स तयार करणारी पहिली कंपनी असल्याचा दावा वॉलेटमॉरने मागील वर्षी केला होता. आता या कंपनीने अशाप्रकारचे 500 चिप विकले आहेत. या विशेष चिपद्वारे कुणालाही बँकिंग कार्डचा वापर न करताना स्वतःच्या ‘हाता’ने पेमेंट करता येते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमचा हातच एक बँकिंग कार्ड, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डप्रमाणे काम करणार आहे. हाताला कॉन्टॅक्टलेस स्वॅप मशीननजकी नेत बिल भरता येणार आहे. मॉलपासून दुकानापर्यंत कुठेही स्वतःच्या हाताने पेमेंट होऊ शकेल.
वॉलेटमॉर चिपचे वजन एक ग्रॅमपेक्षाही कमी आहे. या चिपचा वापर करणारा पॅट्रिक पॉउमॅन जेव्हा एखाद्या दुकान किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल पेमेंट करतो, तेव्हा तेथे असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. पॅट्रिक स्वतःचा हात कॉन्टॅक्टलेस मशीनकडे नेतो आणि पेमेंट होऊन जाते. पॅट्रिक मूळचा नेदरलँड्सचा रहिवासी असून 2019 पासून या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तेव्हा शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या हातात कॉन्टॅक्टलेस पेमेंट मायक्रोचिप बसविण्यात आली होती. चिप बसविण्यात आल्यावर कुठलाच त्रास झाला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
या इम्प्लांटनंतर तुम्ही कॉफी, ग्रॉसरी स्टोअर, ड्रिंक्स, हेयर कटिंगचे बिल जगातील कुठल्याही मोठय़ा शहरात भरू शकता. जेथे कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्वीकारले जाणाऱया प्रत्येक ठिकाणी याचा वापर करता येतो. हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आहे. या तंत्रज्ञानासाठी कुठल्याही प्रकारची बॅटरी किंवा अन्य ऊर्जास्रोताची गरज भासत नसल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक वोजतेक पापरोटा यांनी म्हटले आहे.