प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य श्रीराम मंदिर
गाडे मार्ग, आचार्य गल्ली, शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त पहाटे चिदंबर व महेश ग्रामोपाध्ये यांनी मंदिरात पूजा-अर्चा केली. खासबाग महिला मंडळाच्या महिलांनी जन्मोत्सव साजरा करून पाळणा म्हटला. याप्रसंगी भाविक तसेच सेवेकरी उपस्थित होते.
घुमटमाळ माऊती मंदिरात हनुमान जयंती
हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ माऊती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
बुधवारी रात्री 8 ते 9.30 या वेळेत वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला. गुरुवारी पहाटे 4 वाजता हनुमान मूर्तीला 200 जणांनी अभिषेक घातला. जन्मोत्सवानंतर भजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
मारुती देवस्थानतर्फे जयंती
सालाबादप्रमाणे श्री मारुती देवस्थान ट्रस्ट समिती, बाजार गल्लीतर्फे हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त बुधवारी रात्री 8.30 ते रात्री 11 या वेळेत भजन झाले. गुरुवार दि. 6 रोजी पहाटे 4.30 ते 6 या वेळेत हनुमानाला महाअभिषेक व पूजा, सकाळी 6 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव व सायंकाळी 5 वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
सदर मिरवणूक बाजार गल्ली, मारुती देवस्थानपासून सुरू होऊन तेग्गीन गल्ली, धामणे रोड, चावडी गल्लीतून रामदेव गल्लीमार्गे येऊन राम मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर सोनार गल्लीमार्गे परत बाजार गल्लीतून मारुती मंदिरापर्यंत मिरवणुकीची सांगता झाली. रात्री 8.30 वाजता महाआरती झाली.
अनगोळ येथे आज श्री हनुमान जन्मोत्सव
चैत्र पौर्णिमा व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अनगोळ येथे गुरुवार व शुक्रवारी सालाबादप्रमाणे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनगोळ येथील रघुनाथपेठमधील मारुती मंदिर येथे गुरुवारी पहाटे जन्मोत्सव पार पडला. त्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम झाला.
मारुती मंदिर येथे प्रदक्षिणा घालून आंबिल व घुगऱ्यांचे वाटप करण्यात येऊन गाड्यांची मिरवणूक निघाली. या यात्रोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचबरोबर शुक्रवारीही गाडे काढण्यात येणार असून पारंपरिक हलगी वादन होणार आहे.
शहापूर मारुती मंदिर
खडेबाजार शहापूर येथील श्री माऊती देवस्थान येथे गुरुवारी पहाटे 5.15 वाजता हनुमानाची पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाला असंख्य भाविक आणि प्रामुख्याने महिला उपस्थित होत्या. सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला.
राणी चन्नम्मानगर
राणी चन्नम्मानगर येथील श्री गणेश व मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त सकाळी अभिषेक व 6.24 वाजता पाळणा झाला. त्यानंतर महाआरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आले. सायंकाळी महिला मंडळातर्फे भजन झाले. त्यानंतर महिलावर्गाने चैत्रोत्सवही साजरा केला. दीनानाथ कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
खडेबाजार
खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील माऊती मंदिरात पोलीस स्थानकाच्यावतीने हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी 6 वाजता जन्मोत्सव व विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. भाविकांना तीर्थप्रसाद व सुंठवडा देण्यात आला. दीपक गुरव यांनी पौरोहित्य केले.
कोरे गल्ली, शहापूर
कोरे गल्ली, शहापूर येथील बाल हनुमान व्यायामशाळेत हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्तोत्र म्हणून आरती करण्यात आली. यावेळी गल्लीतील सरपंच पांडुरंग शिंदे तसेच आजी-माजी पंच, हनुमान भक्त उपस्थित होते. उपस्थितांना तीर्थप्रसाद देण्यात आला.
उद्यमबाग-राजाराम मंदिर
उद्यमबाग-राजाराम मंदिर येथे गुरुवारी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर 7.30 वाजता अभिषेक व पूजा झाली. सायंकाळी 7.30 वाजता भजनी मंडळातर्फे भजन झाले. शुक्रवार दि. 7 रोजी अंजनेय होमहवन व दुपारी 12 ते 3 महाप्रसाद होणार आहे.
कार पार्किंग
कार पार्किंग येथे विठ्ठल-रखुमाई मंदिरातील श्री हनुमान मूर्तीची पूजा व अभिषेक जगन्नाथ कामटे, पुणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. महादेव चौगुले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. अशोक पोतदार यांच्या हस्ते जगन्नाथ कामटे यांचा सत्कार करण्यात आला. कामटे यांनी श्री संभाजी उद्यान येथे ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे महादेव चौगुले यांचा प्रभाकर कणबर्गी यांनी सत्कार केला. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.
बाजर गल्ली, हनुमान मंदिर
बाजार गल्ली, वडगाव येथील हनुमान मंदिरामध्ये दि. 5 रोजी भजन झाले. पहाटे 4.30 वाजता महाअभिषेक व मंत्रघोष झाला. सकाळी 6 वाजता जन्मोत्सव होऊन पाळणा म्हणण्यात आला. पुजारी बद्रीनाथ कुलकर्णी व मंजुनाथ यांनी हनुमानाला हार अर्पण केला. वैजनाथ उच्चुकर यांनी रुईच्या पानांवर हनुमान जयघोष लिहून हार अर्पण केला. सायंकाळी 5 वाजता जन्मोत्सवाची पालखी निघाली. रात्री 8.30 वाजता पुन्हा आरती व तीर्थप्रसाद देण्यात आला.
शहापूर-पी. बी. रोड
पी. बी. रोड, शहापूर येथील श्री हनुमान जन्मोत्सव मंडळ गुड्स रिक्षा स्टॅन्डतर्फे सकाळी 6.30 वाजता सचिन अष्टपुत्रे यांच्या हस्ते अभिषेक करून कुंकुमार्चन होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पाळणा म्हणण्यात येऊन सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला.
होसूर बसवाण गल्ली
होसूर-बसवाण गल्ली, पॅटसनजवळील हनुमान मंदिरमध्ये पहाटे 5 वाजता भटजी मुकुंद भिडे यांनी मंत्रघोष केला. पुजारी प्रितम कदम यांनी हनुमानाला पंचाभिषेक व रुद्राभिषेक केला. सूर्योदयावेळी जन्मोत्सव झाला. आरती व पाळणा झाल्यानंतर प्रसाद देण्यात आला.
शहापूर-विठ्ठल मंदिर
शहापूर-विठ्ठल मंदिर, विठ्ठलदेव गल्ली येथील हनुमान मंदिरमध्ये पहाटे 5 वाजता अभंग व भजन झाले. हभप चव्हाण महाराज व विकी कलागते यांनी भजन सादर केले. नागेशशास्त्राr हेर्लेकर यांनी मंत्रघोष केल्यानंतर सूर्योदयाला जन्मोत्सव झाला.
रेल्वे ओव्हरब्रिज
खानापूर रोडवर असलेल्या मारुती मंदिरामध्ये सूर्योदयावेळी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर अभिषेक व पूजा झाली. दुपारी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी गर्दी केली होती.