हर हर महादेव हा चित्रपट आता वादाच्य़ा भोवऱ्य़ात सापडला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता अनेक नेत्य़ांनी याला विरोध दर्शवला आहे. तर यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटावर न बोलण्याचा सल्ला दिला आहे.चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणे गरजेचे आहे. मात्र, या प्रकरणाला जातीय वळण दिलं जातं आहे. राष्ट्रवादीची भूमिका ही जातीयवादाकडे नेणारी आहे, त्यामुळे आपण या प्रकरणावर कोणीही बोलू नका, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रवक्त्यांना दिला.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता, त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला, त्यामुळे या चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पुन्हा एकदा समोरामोर उभे ठाकले आहेत. तर अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ‘शो बंद पडताय, मग आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादीच्या गुंडांनी मारहाण केली, असा आरोप खोपकर यांनी ट्विटद्वारे केला आहे.

