सूर्यकुमार उपकर्णधारपदी, लंकेविरुद्ध टी-20 व वनडे मालिकेसाठी संघांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेटमधील संक्रमणाच्या कालावधीला सुरुवात झाली असून वरिष्ठ खेळाडूंना हळूहळू संघाबाहेर केले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 3 जानेवारीपासून लंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 व वनडे मालिका सुरू होत असून या मालिकेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाकडे टी-20 संघाचे तर वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असून अनुभवी शिखर धवनला वनडे संघातून बाहेर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2022 वर्ष गाजविणाऱया सूर्यकुमार यादववर टी-20 संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
27 वर्षीय हार्दिकला वनडे संघाचा उपकर्णधारही करण्यात आले आहे. यावरून बीसीसीआय त्याच्याकडे दीर्घकाळासाठी मर्यादित षटकांच्या संघांची जबाबदारी सोपवण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट होते. रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडे पूर्ण वेळ ही जबाबदारी दिली जाऊ शकते. रोहित सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असला तरी वनडे मालिकेसाठी त्याला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. मात्र टी-20 साठी नव्या खेळाडूंना विशेषतः आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्यांना संधी देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असल्याचे दिसून येते. स्टार फलंदाज विराट कोहली व केएल राहुल यांनाही टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. 2024 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेवर नजर ठेवत कोहली, राहुलसह रोहितलाही यापुढे निवडले जाणार नसल्याचे त्यातून संकेत मिळत आहेत. या तिघांनाही वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाईल. कारण पुढील वर्षी वनडे विश्वचषक भारतातच होणार आहे.
‘रोहितला टी-20 कर्णधारपदावून काढून टाकण्यात आलंय, अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्याच्यासह कोहली व राहुल यांना या प्रकारांतून हळूहळू बाहेर केले जाणार आहे. रोहितची दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नाही. पण त्याने ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. मात्र ‘फेजिंग आऊट’ प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. हे वर्ष आपल्या चित्तथरारक फटकेबाजीने गाजविणाऱया सूर्यकुमार यादवला मात्र टी-20 उपकर्णधारपदाचे बक्षीस मिळाले आहे.
अलीकडेच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहितच्या जागी हार्दिककडे नेतृत्व सोपविण्याची चर्चा सुरू झाली होती. रोहित सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र त्याच्याकडून टी-20 संघाचे नेतृत्व फक्त एका मालिकेसाठी की कायमचे काढून घेण्यात आले आहे, हे बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही.
या संघात शिवम मावी व मुकेश कुमार या दोन नव्या पेसर्सना संधी देण्यात आली आहे. मावीला गुजरात टायटन्सने 6 कोटीला तर बंगालच्या मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना घेतले आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलेल्या ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. वनडे संघात मात्र अनुभवी खेळाडूंनाच प्राधान्य देण्यात आले असून शमीला त्यात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.
रिषभ पंतला दोन्ही संघांत स्थान मिळालेले नाही. गुडघे मजबूत करण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशन प्रोग्राम करण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे लंकेविरुद्धच्या पूर्ण मालिकेत तो खेळताना दिसणार नाही. मात्र त्याला विश्रांती दिलीय की वगळण्यात आलेय, ही बीसीसीआयने नमूद केलेले नाही.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक ग्रेट क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱया शिखर धवनला आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दुरावली आहे. तो बराच काळ बॅडपॅचमधून जात असल्याने त्याला वनडे संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा परतीचा रस्ता बंद झालाय, असेच म्हणावे लागेल. अजब वाटणारी बाब म्हणजे बांगलादेशच्या मालिकेआधी न्यूझीलंडविरुद्ध तो संघाचा कर्णधार होता. पण त्या मालिकेत धावांचा वेग राखण्यात व योगदानात सातत्य राखण्यात आलेले अपयश त्याला संघाबाहेर ठेवण्यास कारणीभूत ठरले आहे. रोहितचे सलामीचे स्थान भक्कम आहे तर शुबमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याशिवाय इशान किशनने वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक नोंदवण्याचा विक्रम केल्याने अनके पर्याय मिळाले आहेत. त्यामुळे धवनकडे दुर्लक्ष होणार, हे स्पष्ट झाले होते. धवन हा 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी व 2015 वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारताचा स्टार परफॉर्मर होता.
ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार) इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा (उपर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.