वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघातील मध्यफळीत खेळणारा हार्दिक सिंग तसेच भारतीय महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविता पुनिया यांची हॉकी इंडियातर्फे 2022 च्या कालावधीतील अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष आणि महिला हॉकीपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी हॉकी इंडियातर्फे आयोजिलेल्या पुरस्कार वितरण समारंभावेळी मान्यवरांच्या हस्ते हार्दिक सिंग आणि सविता पुनिया यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
2022 च्या कालावधीतील सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूंच्या शर्यतीमध्ये हार्दिक सिंग, मनप्रित सिंग आणि हरमनप्रित सिंग यांच्यात चुरस होती पण हार्दिक सिंगने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. हॉकी इंडियाच्या पाचव्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभावेळी भारतीय हॉकी क्षेत्रातील माजी ऑलिम्पिक हॉकीपटू बलबिर सिंग सिनियर व हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या जानेवारी महिन्यात ओडीशामध्ये झालेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत हार्दिक सिंगची कामगिरी अधिक दर्जेदार झाल्याचे जाणवले पण तत्पुर्वी त्याला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सहभागी होता आले नव्हते. विश्वचषक हॉकी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हार्दिक सिंगच्या गोलच्या जोरावर भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला होता पण या स्पर्धेत यजमान भारताला प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडावे लागले.


महिलांच्या विभागात गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत सविता पुनियाने भारताचे नेतृत्व करताना ही स्पर्धा जिंकली होती. या कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघाला महिलांच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत प्रवेश मिळवता आला होता.
हार्दिक सिंग आणि सविता पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. हॉकी इंडियातर्फे यावर्षी पुरस्कार विजेत्यांच्या बक्षीस रकमेमध्ये 2.7 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. 2021 च्या कालावधीत देशात कोरोनाचे संकट असल्याने त्यावर्षी हॉकी इंडियातर्फे पुरस्कार वितरण समारंभ रद्द करण्यात आला होता. पण शुक्रवारच्या हॉकी इंडियाच्या बक्षीस वितरण समारंभावेळी 2021 सालातील पुरस्कार विजेत्यांनाही बक्षीसे देण्यात आली. 1964 साली ऑलिम्पिक हॉकीचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघातील सदस्य गुरुबक्ष सिंग यांना 2022 सालातील मेजर ध्यानचंद आजीवन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गुरुबक्षसिंग यांना चषक व 30 लाख रुपये हे रोख बक्षीस देण्यात आले. 1968 च्या मेक्सिको ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे गुरुबक्ष सिंग उपकप्तान म्हणून होते. तसेच 1966 च्या आशियाई स्पर्धेत हॉकीचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारताच्या हॉकी संघाचे नेतृत्व गुरुबक्ष सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्याचप्रमाण 1956 च्या मेलबोर्न येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य अमित सिंग बक्षी यांचाही या समारंभात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भारतीय हॉकी संघाचा विद्यमान कप्तान हरमनप्रित सिंग याचा 2022 सालातील सर्वोत्तम बचावपटूचा पुरस्कार देण्यात आला. 2022 च्या कालावधीत कृष्णन पाठकची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 2022 च्या कालावधीतील भारतीय हॉकी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा हॉकी इंडियाचा धनराज पिल्ले पुरस्कार भारतीय महिला संघातील हॉकीपटू वंदना कटारियाला देण्यात आला. वंदनाला पुरस्कार आणि रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देयात आले.