यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारत 50 धावांनी विजयी
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही वरचष्मा गाजवल्यानंतर भारताने येथील पहिल्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडचा 50 धावांनी एकतर्फी फडशा पाडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताने 20 षटकात 8 बाद 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 19.3 षटकात सर्वबाद 148 धावांवरच गाशा गुंडाळावा लागला. अष्टपैलू हार्दिकने प्रथम फलंदाजीत 33 चेंडूत 51 धावांची आतषबाजी केली आणि नंतर गोलंदाजीत अवघ्या 33 धावांमध्ये 4 मोहरे गारद केले. एकाच टी-20 सामन्यात अर्धशतक व 4 बळी, अशी चतुरस्त्र कामगिरी करणारा तो पूर्ण सदस्य देशांमधील केवळ चौथा खेळाडू ठरला.
नियमित कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि याचा हार्दिक पंडय़ाने पुरेपूर लाभ घेतला. त्याने येथे टी-20 कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक झळकावले. तत्पूर्वी, रोहित शर्मा (14 चेंडूत 24), दीपक हुडा (17 चेंडूत 33) व सूर्यकुमार यादव (19 चेंडूत 39) यांनी फ्लाईंग स्टार्ट मिळवून देण्यासाठी भरीव प्रयत्न केले. भारताने या लढतीत एकवेळ 17 व्या षटकाअखेर 7 बाद 178 धावा जमवल्या होत्या. पण, शेवटच्या 3 षटकात त्यांना यात आणखी केवळ 20 धावांची भर घालता आली.
इंग्लंडला प्रारंभीच झटका
विजयासाठी 199 धावांचे संरक्षण करण्याचे लक्ष्य असताना भुवनेश्वर कुमारने कर्णधार जोस बटलरचा अप्रतिम इनस्विंगरवर त्रिफळा उडवत स्वप्नवत सुरुवात केली. शिवाय, जेसॉन रॉयची (4) आऊटस्विंगर्सवर चांगलीच परीक्षा घेतली. फलंदाजीत वरचष्मा गाजवून गोलंदाजीसाठी आल्यानंतर हार्दिकने पहिल्याच षटकात एक नव्हे तर दोन धक्के दिले. त्याने मलान व लिव्ंिहंगस्टोन यांना एकाच षटकात बाद केले आणि इंग्लंडची 5 व्या षटकात 3 बाद 29 अशी दाणादाण उडाली. नंतर हार्दिकने आणखी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत 4 षटकांमध्ये 33 धावात 4 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले.
हार्दिक पंडय़ाला यजुवेंद्र चहल व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 बळींसह उत्तम साथ दिली. भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
फलंदाजीतही पंडय़ाचा वरचष्मा
भारताने 20 षटकात 8 बाद 198 धावा केल्या, त्यात हार्दिक पंडय़ाचे अर्धशतक लक्षवेधी ठरले. त्याने 33 चेंडूत 6 चौकार, एक षटकारासह 51 धावांचे योगदान दिले. याशिवाय, सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 39 तर दीपक हुडाने 17 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 33 धावा जमवल्या. रोहित शर्माने देखील 14 चेंडूत जलद 24 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 5 सणसणीत चौकारांचा समावेश राहिला.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 8 बाद 198 (हार्दिक पंडय़ा 33 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 51, सूर्यकुमार यादव 19 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 39, दीपक हुडा 17 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 33, रोहित शर्मा 14 चेंडूत 5 चौकारांसह 24. अवांतर 9. ख्रिस जॉर्डन 4 षटकात 2-23, मोईन अली 2 षटकात 2-26, रीस टॉपली, तिमल मिल्स, मॅट पार्किन्सन प्रत्येकी 1 बळी).
इंग्लंड ः 19.3 षटकात सर्वबाद 148 (मोईन अली 20 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 36, हॅरी ब्रूक 23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 28, ख्रिस जॉर्डन 17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 26. अवांतर 13. हार्दिक पंडय़ा 4 षटकात 4-33, यजुवेंद्र चहल 4 षटकात 2-32, अर्शदीप सिंग 3.3 षटकात 2-18, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल प्रत्येकी 1 बळी).
कोट्स
आमची फलंदाजी अतिशय उत्तम झाली आणि या जोरावर विजय साकारणे सोपे झाले. धावांचा डोंगर रचण्यासाठी पॉवरप्लेचा पुरेपर लाभ घेणे शक्य झाल्याने आम्ही दोनशेहे धावांच्या उंबरठय़ावर पोहोचण्यात यशस्वी ठरलो. हार्दिकचे गोलंदाजीतील वैविध्य वैशिष्टय़पूर्ण ठरले.
-भारतीय कर्णधार रोहित शर्मा
नव्या चेंडूवर भारतीय गोलंदाजांनी अतिशय उत्तम मारा केला आणि यामुळे आमच्या फलंदाजांवर बरेच दडपण आले. भुवनेश्वर कुमार कोणत्याही वातावरणात, कितीही प्रतिकूल स्थितीत चेंडू उत्तमरित्या स्विंग करु शकतो, हे पुन्हा एकदा दिसून आले.
-इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर
उभय संघात आज रंगणार दुसरी टी-20, विराट मुख्य आकर्षण
बर्मिंगहम ः पहिल्या सामन्यात दमदार विजय संपादन केल्यानंतर भारतीय संघ आज (शनिवार दि. 9) दुसऱया टी-20 सामन्यात तोच विजयी धडाका कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. याचवेळी विराट कोहली या लढतीत भारतीय संघात परतत असल्याने अर्थातच संघाचे मनोबल उंचावलेले असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
विराट कोहलीने यापूर्वी फेबुवारीमध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. मागील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकपमध्ये कर्णधार या नात्याने पूर्ण निराशा केल्यानंतर तो केवळ दोनच टी-20 खेळला आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याचा सहभाग राहिला. मात्र, तेथेही तो आपला लौकिक अधोरेखित करण्यापासून कित्येक कोस दूर होता.
कोहलीच्या गैरहजेरीत त्याच्या नेहमीच्या वनडाऊन पोझिशनवर उतरणाऱया दीपक हुडाने उत्तम वरचष्मा गाजवला असून यामुळे आज विराट परतत असताना हुडाला वगळणे अवघड असेल. यापूर्वी, पहिल्या टी-20 लढतीत हुडाने 17 चेंडूत जलद 33 धावा फटकावल्या होत्या. आज विराट परतत असताना हुडाचे स्थानही अबाधित राखण्याचा निर्णय झाला तर या परिस्थितीत इशान किशनला राखीव खेळाडूत बसावे लागू शकते. त्यामुळे, विराट-रोहित सलामीला उतरण्याची शक्यता असेल. विराटने यापूर्वी सलामीला अनेकदा फलंदाजी केली असून आश्चर्य म्हणजे त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे अर्धशतक सलामीला फलंदाजीला उतरतानाच केले आहे. विराटप्रमाणेच, रिषभ पंत, जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर या टी-20 मालिकेत उपलब्ध असणार आहेत.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.
इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करण, रिचर्ड ग्लेसन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, तिमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन, जेसॉन रॉय, फिल सॉल्ट, रीस टॉपली, डेव्हिड विली.
सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.