भारताची युवा वेटलिफ्टर हरजिंदर कौरने सोमवारी महिलांच्या 71 किलोग्रॅम वेटलिफ्ंिटग इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत हरजिंदर ही प्रतिस्पर्ध्यांकडून मोक्याच्या क्षणी चुका झाल्याने सुदैवी देखील ठरली. नायजेरियाची सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार जॉय इझे हिला क्लीन अँड जर्क कॅटेगरीत सलग दोन फाऊलना सामोरे जावे लागले आणि अगदी नाटय़मयरित्या ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली.
या इव्हेंटमध्ये इंग्लंडच्या साराह डेव्हिसने 229 किलोग्रॅम वजन उचलत सुवर्ण जिंकले तर कॅनडाची ऍलेक्सिस ऍशवर्थने 214 किलोग्रॅम वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. हरजिंदरने स्नॅचमध्ये 93 किलो व क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो असे एकूण 212 किलो वजन उचलत कांस्य मिळवले. सुवर्ण जिंकणाऱया डेव्हिसने येथे राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमही मोडीत काढला.
प्रारंभी, हरजिंदरला पहिल्या प्रयत्नात 90 किलोग्रॅम स्नॅचमध्ये अपयश आले. मात्र, दुसऱया प्रयत्नात दडपण झुगारत तिने 90 किलोग्रॅम स्नॅचमध्ये यश खेचून आणले. येथे तिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली. त्यानंतर तिसऱया स्नॅचमध्ये 93 किलोग्रॅम वजन उचलत ती पोडियम फिनिशसाठी स्पर्धेत कायम राहिली. पुढे, क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये हरजिंदरची ऑस्ट्रेलियाच्या कियाना इलियॉटविरुद्ध कांस्यपदकासाठी चुरस रंगली.
गतवर्षी राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकलेल्या हरजिंदरने येथे क्लीन अँड जर्क राऊंडला 113 किलोग्रॅम लिफ्टसह उत्तम सुरुवात केली आणि नंतर दुसऱया प्रयत्नात 116 किलोग्रॅमपर्यंत सरस कामगिरी नोंदवली. तिसऱया प्रयत्नात तिने 119 किलोग्रॅम अशी आणखी सरस कामगिरी साकारत तिसरे स्थान मिळवले.
मुष्टियोद्धे अमित पांघल, मोहम्मद हुस्समुदिन, आशिष कुमार उपांत्यपूर्व फेरीत
भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघलने पुरुषांच्या फ्लायवेट (51 किलोग्रॅम) इव्हेंटमध्ये शानदार विजय संपादन करत आपल्या मोहिमेला जोरदार सुरुवात केली. वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेत्या पांघलने प्रतिस्पर्धी बेरीला एकतर्फी फरकाने मात दिली.
फिदरवेट मुष्टियोद्धा मोहम्मद हुस्समुदिनने बांगलादेशच्या मोहम्मद सलिम होसेनला राऊंड ऑफ 16 मध्ये 5-0 अशा फरकाने मात केली.. त्यानंतर दिवसाच्या उत्तरार्धात लाईट हेविवेट बॉक्सर आशिष कुमारने 80 किलोगॅम वजनगटात ट्रव्हिसला नॉकआऊट केले. टोकियो ऑलिम्पिकमधील अपयशी कामगिरीनंतर प्रथमच एखाद्या मोठय़ा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या पांघलने आपल्या तिन्ही फेऱयांमध्ये उत्तम वर्चस्व गाजवले. आता राष्ट्रकुलमध्ये दुसरे पदक निश्चित करण्यापासून तो केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे. यापूर्वी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. येथे बर्मिंगहममध्ये पुढील फेरीत स्कॉटलंडच्या लेनॉन मलिगनविरुद्ध त्याची लढत रंगणार आहे.
श्रीहरीला पाचवे स्थान, साजन प्रकाशचे आव्हान संपुष्टात
भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजला पुरुषांच्या 50 मीटर्स बॅकस्ट्रोक इव्हेंटमध्ये पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले तर पुरुषांच्या 100 मीटर्स बटरफ्लायमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आल्यानंतर साजन प्रकाशचे राष्ट्रकुल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सँडवेल ऍक्वेटिक्स सेंटरमध्ये श्रीहरीने 25.23 सेकंद अशी वेळ नोंदवली. बेंगळूरच्या या जलतरणपटूला रविवारी 100 मीटर्स बॅकस्ट्रोक फायनलमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
शरथच्या नेतृत्वाखाली भारत अंतिम फेरीत
शरथ कमलने जागतिक क्रमवारीतील 15 व्या मानांकित अरुणा कादरीचा अक्षरशः धुव्वा उडवल्यानंतर विद्यमान विजेत्या भारतीय संघाने नायजेरियाचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
जी. साथियन व हरमीत देसाई यांनी ओमातायो व अबिओदून यांचा सरळ गेम्समध्ये फडशा पाडल्यानंतर 40 वर्षीय शरथने कादरीविरुद्ध 11-9, 7-11, 11-8, 15-13 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. शरथने आक्रमक पवित्र्यावर भर देत विजय खेचून आणला. लाँग व फास्ट रॅली हे या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. त्यानंतर साथियनने ओमातायोविरुद्ध 11-9, 4-11, 11-6, 11-8 अशा फरकाने विजय मिळवत भारताच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.
बॅडमिंटनमध्ये भारताची अंतिम फेरीत धडक, किमान रौप्य निश्चित
भारतीय बॅडमिंटन संघाने मिश्र गटात मंगळवारी आणखी एक धमाकेदार विजय संपादन केला. भारताने पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली सिंगापूरचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडला.
पुरुष दुहेरीतील पहिल्या सामन्यात सात्विकसाईराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी 21-11, 21-12 असा विजय मिळवत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱया सामन्यात पीव्ही सिंधूने जिया मेन येओ हिचा 21-11, 21-12 असा धुव्वा उडवला. त्यानंतर मालिकेतील तिसऱया लढतीत लक्ष्य सेनने किन यू लोहविरुद्ध 21-18, 21-15 असा विजय मिळवित आणि भारताने 3-0 असा एकतर्फी विजय नोंदवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले असून किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे.
मुरली श्रीशंकर व मोहम्मद अनिस फायनलमध्ये
भारतीय ऍथलिट मुरली श्रीशंकर व मोहम्मद अनिस याहिया यांनी पुरुषांच्या लांब उडी इव्हेंटमध्ये अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. अ पात्रता फेरीत श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नात 8.05 मीटर्सची उडी घेतली आणि त्याचे इतके प्रयत्न अंतिम फेरीतील स्थाननिश्चितीसाठी पुरेसे ठरले. बहामासचा लॅक्यून नैरनने 7.90 मीटर्सची उडी घेतली तर दक्षिण आफ्रिकेचा जोव्हन व्हान व्हय़ुरेनने 7.87 मीटर्स उडीसह तिसरे स्थान मिळवले. प्रत्येक गटातून एकूण 8 अव्वल ऍथलिट फायनलसाठी पात्र ठरले.
ब गट पात्रता फेरीत अनिसने पहिल्या प्रयत्नात 7.49 मीटर्सची उडी घेतली. त्यानंतर दुसऱया प्रयत्नात 7.68 मीटर्स व तिसऱया प्रयत्नात 7.49 मीटर्स अशी त्याची कामगिरी राहिली. 7.68 मीटर्ससह त्याने पात्रता मोहिमेची सांगता केली.
वेटलिफ्टर पूनम यादव 76 किलोग्रॅम फायनलमध्ये अपयशी
भारतीय वेटलिफ्टर पूनम यादवचे महिलांच्या 76 किलोग्रॅम वेटलिफ्ंिटगमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. तिला क्लीन अँड जर्क इव्हेंटमध्ये लागोपाठ अपयशामुळे पदकाची आशा सोडून द्यावी लागली. वास्तविक, स्नॅच कॅटेगरीमध्ये पूनमने 98 किलोग्रॅमच्या बेस्ट लिफ्टसह उत्तम सुरुवात केली होती. मात्र, पुढे क्लीन अँड जर्क कॅटेगरीत ती तिन्ही प्रयत्नात अपयशी ठरली आणि यामुळे पदकाच्या शर्यतीतून देखील बाहेर फेकली गेली.
या इव्हेंटमध्ये कॅनडाची माया लेयलर 228 किलोग्रॅम लिफ्टसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली. नायजेरियाच्या तायवो लियादिने 216 किलोग्रॅम लिफ्टसह रौप्य तर मॅक्झिमिना युएपाने 215 किलोग्रॅम लिफ्टसह कांस्य जिंकले.